कुख्यात चंदन तस्कर वीरप्पनच्या मुलीची भाजपा युवा मोर्चाच्या उपाध्यक्षपदी निवड, काही दिवसांपुर्वी केला होता पक्ष प्रवेश

चेन्नई : पोलीसनामा ऑनलाइन – तामिळनाडू भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीने कुख्यात चंदन तस्कर वीरप्पनची कन्या विद्याराणी हिची प्रदेश भाजपा युवा मोर्च्याच्या उपाध्यक्षपदी निवड केली आहे. काही महिन्यांपूर्वी वीरप्पनच्या कन्येने भाजपात प्रवेश केला होता. तसेच माजी मुख्यमंत्री एम. जी. रामचंद्रन यांचे नातेवाईक आणि इतर अनेक चित्रपट कलावंताची विविध पदांवर निवड करण्यात आली आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष एल. मुरुगन हे राज्यात पक्षाचा विस्तार करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तसेच पुढील वर्षी तामिळनाडूमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवरती या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. तथापि, एआयएडीएमकेचे संस्थापक एमजी रामचंद्रन यांची दत्तक कन्या गीता, रामचंद्रन यांचे भाऊ एमसी चक्रपाणी यांचा मुलगा आर. प्रवीण आणि अभिनेत्री राधा रवी यांची पक्षाच्या राज्य कार्यकारिणी समितीत सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

तामिळनाडू आणि कर्नाटक राज्यात दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात चंदन तस्कर वीरप्पन याला २००४ साली पोलिसांनी चकमकीत ठार केले होते. वीरप्पन याने २००० साली कन्नड अभिनेते राजकुमार आणि २००२ मध्ये कर्नाटकचे माजी मंत्री एच. नागप्पा याचे अपहरण केले होते.