‘आता भाजपवाल्यांना मत द्यायचं नाही, तर मूत्र पाजायचं’ 

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन – शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी मत मांडताना अतिशय खालच्या थराचं विधान केलं आहे. ”सरकारला जागं करायचं असेल तर मंत्र्यांच्या गाड्या पेटवा”, असं प्रक्षोभक आणि आक्षेपार्ह विधान त्यांनी केल्याचं समोर आलं आहे. एवढेच बोलून ते थांबले नाही तर, ”आता निवडणुकीत भाजपवाले मतं मागायला येतील तेव्हा त्यांना मत द्यायचं नाही, तर मूत्र पाजायचं”, असं अत्यंत खालच्या भाषेतलं वक्तव्य तुपकर यांनी यावेळी केलं. अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापूर येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी सुरु असलेल्या धरणे आंदोलनात ते बोलत होते. यावेळी त्यांनी हे विधान केले.
यावेळी बोलताना तुपकर म्हणाले की,  ”सरकारला जागं करायचं असेल तर मंत्र्यांच्या गाड्या पेटवा.” पुढे बोलताना ते असेही म्हणाले की, ”आता निवडणुकीत भाजपवाले मतं मागायला येतील तेव्हा त्यांना मत द्यायचं नाही, तर मूत्र पाजायचं” मुर्तीजापूर येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन सुरू होतं. पंरतु शेतकऱ्यांचं निवेदन घ्यायला कोणताच जबाबदार अधिकारी तेथे आला नसल्याने  तुपकर आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
यावर प्रतिक्रिया देताना कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले की, “लोकशाहीमध्ये मताचा अधिकार हा जनतेला असतो. जनता ही सर्वश्रेष्ठ आहे. मला वाटतं ज्यांना लोक माणसांमध्ये कवडीचीही किंमत नाही लोकशाहीच्या माध्यमातून असे बोलणारे लोक निवडणुकीला उभे राहिले तर त्यांचे डिपाॅझिट जप्त होईल. असे लोकं काही प्रिसद्धीसाठी असे वक्तव्य करत असतात.”
पुढे बोलताना ते असेही म्हणाले की, “ज्यांनी सत्तेचा उपभोग घेतला, लाल दिव्याच्या गाडीतून फिरले आणि आता सर्व केल्यानंतर मी त्यातला नाही असे म्हणण्यासारखा हा प्रकार आहे. मला वाटतं की या वक्तव्याची फारशी दखल घेण्याची गरज नाही. दखल घेण्यासाठी ते व्यक्तीमत्त्व मोठं असावं लागतं. राजकारणामध्ये काही माणसं मोठी नसतात परंतु त्यांच्या सावल्या मोठ्या असतात त्यामुळे त्यांना मी मोठा आहे असं वाटत असेल. बेडकाचा बैल कधीच होत नाही.”
महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनीही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ” हे लोक खालच्या पातळीवरील लोक आहेत यांची बौद्धिक पातळीच तेवढी आहे परंतु भाजपच्या लोकांनी राजू शेट्टी यांंनी तुपकरांना मोठं केलं आणि त्यांची फळं आता त्यांना भोगावी लागत आहेत. त्यांची लायकी नसताना त्यांना जे काही मिळालं ते आता त्यांना मिळत नसल्याने तेच आता इकडून तिकडून मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पुन्हा काँग्रेसमध्ये गेल्यावर तिथे आपलं वजन वाढावं यासाठी अशा पद्धतीची मुक्ताफळे ते व्यक्त करत आहे. आजचा प्रकार म्हणजे सायकलच्या फ्रेमवर बुलेटेच इंजिन ठेवण्यासारखे आहे. सायकलच्या फ्रेमवर बुलेटचं इंजिन ठेवल्यावर जसं होतं तसं हे झालं आहे.”