अंगणवाडी ‘डिजिटल’ ; आता अ‍ॅपद्वारे बालकांची माहिती होणार संकलित

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील सर्वच अंगणवाडी आता ‘डिजिटल’ होणार असून बालकांची सर्व माहिती अ‍ॅपद्वारे ऑनलाइन भरण्यात येणार आहे. शासनाकडून राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका, मुख्यसेविका व पर्यवेक्षकांना स्मार्टफोन देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यासाठी सिमकार्डसह अँड्रॉइड मोबाईलही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

येत्या जूनपासून ऑनलाईन कामकाजाचे प्रशिक्षण सर्व अंगणवाडी सेविकांना देण्यात येणार आहे. त्यामुळे बालकांची सर्व इत्यंभूत माहिती अ‍ॅपद्वारे ऑनलाइन भरण्यात येणार आहे.त्यासाठी पालकांचा संपर्क क्रमांकही घेण्यात येणार आहे, त्याद्वारे कधी लसीकरण आहे, याचा मेसेज पाठवला जाणार आहे. पोषण अभियान अंतर्गत (आयसीटी-आरटीएम) या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. केंद्र शासनाकडून अंगणवाडीसेविकांना स्मार्ट फोन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला.

याबाबत पाठपुरावा होत असल्याने, गेल्या महिन्यात नवीदिल्ली येथे झालेल्या बैठकीत सेविकांना स्मार्टफोन उपलब्ध करून द्यावेत, अशा सूचना राज्य शासनाकडून देण्यात आलेल्या होत्या. यासाठी मे. सिस्टेक आयटी सोल्युशन कंपनीकडून मोबाइल खरेदी करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. हे स्मार्ट फोन महिला व बालकल्याण विभागाकडे प्राप्त झाले आहेत.