‘ओडिशाचे मोदी’ झाले खासदार ; सोशलमीडियावर झाले व्हायरल

वृत्तसंस्था : लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला प्रचंड यश मिळाले. २०१४ मध्ये असलेली मोदी लाट पुन्हा २०१९ मध्येही पहायला मिळाली. या मोदी लाटेत भाजपला अभूतपर्व यश मिळाले. या विजयाचे शिल्पकार पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वत्र नरेंद्र मोदी यांची चर्चा आहे. नरेंद्र मोदी यांच्या चर्चेबरोबर अजून एका मोदींची चर्चा आहे. ते म्हणजे ओडिशाचे मोदी’. प्रताप चंद्र सारंगी यांना ओडिशाचे मोदी म्हणून ओळखले जाते. ओडीशातील बालासोर येथून प्रताप चंद्र सारंगी विजयी ठरले आहेत. ओडीशाचे मोदी या नावाने ओडीशाची जनता त्यांना ओळखते.

https://twitter.com/SulagnaDash6/status/1131984421198819329

सुलगना डॅश नावाच्या एका युजरने सारंगी यांचे तीन छायाचित्र २४ मे रोजी शेअर केले. त्या छायाचित्रात सारंगी यांच अत्यंत साधी राहणीमान दिसून येत आहे. सुलगना डॅश यांनी या छायाचित्रांसोबत ट्विट केलं की, ‘हे आहेत ओदिशाचे मोदी…यांनी लग्न नाही केलंय…गेल्या वर्षीच यांच्या आईचं निधन झालं…संपत्ती नाही…एका छोट्याशा घरात राहतात…सायकल चालवतात…तळाच्या कार्यकर्त्यांचा यांना नेहमीच पाठिंबा आहे आणि आता बालासोर येथून विजयी झाल्याने ते दिल्लीला जाण्याच्या तयारीत आहेत’ त्यानंतर हे ट्विट नेटकऱ्यांच्या चांगलेच पसंतीला उतरले. अनेकांनी हे ट्विट रिट्विट केले आणि त्यामुळे सारंगी सोशलमिडीयावर व्हायरल झाले. सुलगना यांनी ट्विटच्या सुरवातीला हे आहेत ओडिशाचे मोदी असे लिहिल्यामुळे सारंगी यांना ओडिशाचे मोदी असेच म्हंटले जाऊ लागेल. नेटकऱ्यांनी सारंगी यांच्या साध्याराहणीमानाचे खूप कौतुक केले. यानंतर सारंगी यांची इतर छायचित्रे देखील नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर अपलोड केली.

कोण आहेत सारंगी –
गरीब कुटुंबातून येणाऱ्या सारंगी यांचा जन्म निलगिरी येथील गोपीनाथपूर गावात झाला. ४ जानेवारी १९५५ रोजी जन्मलेल्या सारंगी यांनी निलगिरी येथीलच फकीर मोहन महाविद्यालयातून पदवी घेतली. रामकृष्ण मठामध्ये साधू बनण्याची त्यांची इच्छा होती. मात्र, त्यांची आई विधवा असल्याचं समजल्यानंतर घरी जाऊन आईची सेवा कर असा सल्ला त्यांना तेथील लोकांकडून देण्यात आला. त्यानंतर सारंगी आपल्या गावी परतले आणि समाजसेवा सुरू केली. सारंगी यांनी लग्न केलेलं नाहीये तसंच आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी जनसेवेसाठी अर्पण केलं आहे. ते एका छोट्याशा घरात राहतात आणि केवळ सायकलचा वापर करतात. त्यांच्या कुटुंबात केवळ आई होती, पण त्यांचंही गेल्या वर्षी निधन झालं.

सारंगी यांनी बिजू जनता दलाच्या रबिंद्र कुमार जेना यांचा १२ हजार ९५६ मतांनी पराभव केला आहे. २०१४ मध्ये येथे रबिंद्र कुमार जेना विजयी ठरले होते, तर २००९ मध्ये काँग्रेसकडून श्रीकांत कुमार जेना यांनी विजय मिळवला होता. खासदार म्हणून निवडून येण्याआधी सारंगी २००४ आणि २००९ मध्ये निलगिरी विधानसभा क्षेत्रातून आमदार म्हणून विजयी ठरले होते. त्यापूर्वी २०१४ मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.