एसटी महामंडळात क्लर्क असल्याचे बनावट ओळखपत्र तयार करून फिरणाऱ्या भामट्याविरोधात गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – एसटी महामंडळात क्लर्क असल्याचे बनावट ओळखपत्राचा वापर करून एसटीत मोफत प्रवास करणाऱ्या एकाविरोधात स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिल पांडुरंग रासकर (रा. शिरूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. एसटी महामंडळातील वाहतूक निरीक्षक उत्तम लांडे (वय ४९) यांनी यासंदर्भात स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसटी महामंडळातील विभाग नियंत्रकाची बनावट स्वाक्षरी तसेच शिक्क्याचा वापर करून रासकरने महामंडळात क्लर्क असल्याचे ओळखपत्र तयार केले होते. या बनावट ओळखपत्राच्या आधारे तो शिरूर ते पुणे या मार्गावर एसटीतून मोफत प्रवास करत होता. दरम्यान वाहतुक निरीक्षक लांडे यांनी स्वारगेट बसस्थानकामध्ये प्रवाशांची तपासणी केली. तेव्हा रासकरकडे बनावट ओळखपत्र सापडले. त्यानंतर रासकर तेथून पळून गेला. मात्र लांडे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एन. शेख तपास करत आहेत.