पत्नीपीडित पुरूषांनी रावणाऐवजी जाळला शूर्पनखेचा पुतळा

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – दसऱ्याला रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्याची प्रथा असली तरी बायकांच्या त्रासाला कंटाळलेल्या नवरोबांनी चक्क शूर्पनखेच्या पुतळ्याचे दहन केल्याचा भलताच प्रकार औरंगाबादमधील कारोळी गावात घडला आहे. पत्नी पीडित पुरुष संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रावणाऐवजी त्याची बहीण शूर्पनखेच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केल्याने या प्रकाराची सध्या जोरदार चर्चा सर्वत्र सुरू आहे.

बायकांच्या छळाला वैतागलेल्या काही पुरुषांनी एकत्र येत पत्नी पीडित पुरुष संघटना स्थापन केली आहे. या संघटनेच्या सदस्यांनीच औरंबादमधील कारोळी गावात शूर्पनखेच्या पुतळयाचे दहन केले आहे. या प्रकाराबाबत पत्नी पीडित पुरूष संघटनेचे संस्थापक भारत फुलारे म्हणाले, भारतातील सगळे कायदे पुरुषांविरोधात व स्त्रीयांच्या बाजूने आहेत. स्त्रीया या कायद्याच्या नवऱ्यांविरुद्ध व इतर पुरुषांविरुद्ध गैरवापर करत आहेत. म्हणून स्त्रीयांच्या अन्यायाचा निषेध म्हणूनच प्रतिकात्मकरित्या आम्ही रावणाऐवजी शूर्पनखेचे दहन केले आहे. २०१५ च्या गुन्हे अहवालानुसार विवाहित लोकांनी केलेल्या आत्महत्येत ७४ टक्के पुरुष आहेत. त्यातून पुरुषांवर होणाऱ्या अन्यायाची आपण कल्पना करु शकतो, असे फुलारे म्हणाले. विशेष म्हणजे या संघटनेच्या काही सदस्यांनी मीटू मोहिमेवरही टीका केली. रामायणातील शूर्पनखा हीच राम आणि रावणातील युद्धाला कारणीभूत ठरली होती.

शूर्पनखेच्या अपमानाचा बदला म्हणून तिचा भाऊ रावणाने रामाची पत्नी सीतेचे अपहरण केले होते. त्यानंतरच रामाने रावणाविरोधात युद्ध पुकारले होते. या युद्धात रामाने रावणाचा वध केला होता. त्यानुसार दसऱ्याला रावण दहन करण्याची प्रथा आहे. मात्र, ही प्रथा मोडित काढत औरंगाबादमधील या पत्नी पीडित पुरूष संघटनेने शूर्पनखेच्या पुतळ्याचे दहन करण्याचा पायंडा पाडला आहे.

शिवशाहीवरील मद्यधुंद चालक पोलिसांच्या ताब्यात