‘न्युड’ फोटो व्हायरल करण्याची धमकी देणारा ‘गोत्यात’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – इव्हेंटमध्ये काम देण्याचे आमिष दाखवून तरुणीचे न्युड फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे लुबाडणाऱ्यास भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर जबरी चोरी, खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिरेंद्र सिंह मॅथॉन (वय २३, रा. कोरेगाव पार्क ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कासारवाडी येथील एका २३ वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे. हा प्रकार ५ जून पासून २७ ऑगस्ट दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, बिरेंद्र मॅथॉन याची या तरुणीशी गेल्या तीन महिन्यापासून ओळख होती. आपण इव्हेंट ऑर्गनाईज करतो, असे त्याने या तरुणीला सांगून तिचा विश्वास संपादन केला. इव्हेंटमध्ये काम देण्याचे आमिष दाखवून त्याने या तरुणीचे न्युड फोटो व्हॉटसअ‍ॅपवर मागवून घेतले. त्यानंतर काही दिवसांनी त्याने हे न्युड फोटो फेसबुकवर व्हायरल करण्याची धमकी दिली व तिच्याकडे वारंवार पैशाची मागणी तो करु लागला. त्याने या तरुणीच्या बँकेचे ए टी एम कार्ड व पासवर्ड जबरदस्तीने घेतला व त्यातून वेळोवेळी ९० हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तिला त्याने अश्लिल मॅसेज ही व्हॉटसअ‍ॅपवर पाठविले.
शेवटी या धमक्यांना कंटाळून तिने भोसरी पोलिसांशी संपर्क साधून फिर्याद दिली. याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने बिरेंद्र मॅथॉन याला अटक केली.

बिरेंद्र सिंह मॅथॉन याने यापूर्वीही अशा प्रकारे अनेक तरुणींची फसवणूक केल्याचे आढळून आले असून पोलीस निरीक्षक चव्हाण अधिक तपास करीत आहेत.

Loading...
You might also like