तव्हेरा उलटून एकजण जागीच ठार तर ७ जखमी

मूर्तिजापूर : पोलीसनामा ऑनलाईन – मूर्तीजापूर राष्ट्रीय महामार्गावर तव्हेराच्या भिषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर इतर ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज (रविवार) सकाळी साडेआठच्या सुमारास झाला. हे सर्वजण पोही येथून देवदर्शन करुन मुर्तिजापूरच्या दिशेने जात होते. त्यावेळी अचानक तव्हेरा उलटल्याने हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी येऊन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
राष्ट्रीय महामार्ग ६ वर मूर्तिजापूर बायपास कृषि उत्पन्न बाजार समिती जवळ सकाळी ८:३० च्या सुमारास पोही येथून देवदर्शन करून मूर्तिजापूर कडे येत असलेली तवेरा गाडी क्रमांक एमएच१२ बी १३५५ ही चालकाच्या हलगर्जीपणामुळे अचानक उलटल्याने गाडीत बसलेल्या प्रवाशांपैकी रमेश दगडूजी डोंगरे (५५) रा. ब्रम्ही हे घटनास्थळी गतप्राण झाले. तर जयंत खडसे हे गंभीर जखमी झाले असुन त्यांना पुढील उपचारासाठी अकोला सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

उज्ज्वला देशमुख, संगिता देशमुख, मयुर देशमुख सर्व राहणार अंजनगाव सुर्जी चालक मनोहर आंबिलकर ह्या किरकोळ जखमींवर उपचार करुन घरी पाठविण्यात आले.तर इतर किरकोळ जखमी उपचार न घेता परस्पर निघुन गेलेत. गाडीत एकुण १२ प्रवाशी प्रवास करीत होते. पैकी एकाचा  मृत्यू झाला. सर्व जखमींवर मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. चालका विरुध्द गुन्हा दाखल करुन पुढील तपास मूर्तिजापूर शहर पोलीस करीत आहे.