कांदा झाला महाग, पंधरा दिवसांत तीन पटींनी वाढल्या किंमती; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   कांद्याचे दर पुन्हा एकदा वाढू लागले आहेत. गेल्या 15 दिवसांपासून किंमतींमध्ये मोठी वाढ नोंदविली गेली. दिल्ली, मुंबईसह देशातील बर्‍याच शहरांमध्ये गेल्या 15 दिवसांत कांद्याचे दर दोन ते तीन पट वाढले आहेत. दिल्लीत किरकोळ कांद्याचे दर 50 ते 55 रुपयांपर्यंत पोहोचले. जे आठवड्यापूर्वी 20 रुपये प्रति किलो दराने विकले जात होते.

त्याचबरोबर कांद्याचे दर महाराष्ट्रात प्रति क्विंटल 1000 रुपयांपर्यंत वाढले आहेत. मात्र, 15 फेब्रुवारीपासून नाशिक येथून कांद्याचा पुरवठा सुरू होईल, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की ज्यानंतर भाव पुन्हा नरम होतील.

किंमत वाढण्याचे कारण?

या वाढीचे कारण पुरवठ्यातील अडचणी असल्याचे सांगितले जात आहे. पुरवठा कमी झाल्यामुळे कांद्याची किंमत वाढल्याचे आशियातील सर्वात मोठे फळ-भाजीपाला बाजार आझादपूर मंडी समितीचे अध्यक्ष आदिल अहमद खान यांनी सांगितले. तसेच यापूर्वी झालेल्या पावसाने कांद्याच्या पिकावरही परिणाम झाला असून, आवक कमी झाली आहे. सुमारे आठवडाभरापूर्वी बाजारात कांद्याची घाऊक किंमत 22 रुपये प्रतिकिलो होती, जे सध्या 33 रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहे.

एनसीआरमध्येही किंमत झाली दुप्पट

केवळ दिल्लीव्यतिरिक्त नोएडा आणि गाझियाबादमध्ये कांद्याचे दर वाढले आहेत. गेल्या 6-7 दिवसांत गाझियाबादमध्ये कांद्याच्या किंमती अचानक वाढल्या. नाशिकमधून येणार्‍या कांद्याचे घाऊक दर 500-700 रुपयांनी वाढल्याचे घाऊक व्यापा-यांचे म्हणणे आहे. यामुळे कांद्याचे किरकोळ दरही 40 ते 50 रुपयांवर गेले आहेत, जे एका आठवड्यापूर्वी 25-30 रुपये प्रतिकिलो दराने विकले गेले. त्याचबरोबर नोएडामध्येही कांदा 50 ते 60 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचला आहे.

कांदा, बटाटा आणि हिरव्या भाज्या व्यतिरिक्त, मटार, कोबी, मुळा आणि गाजरच्या किमतींमध्ये गेल्या एका आठवड्यात 10-20 टक्क्यांची वाढ झाली आहे.