Hinjawadi News : ऑनलाईन ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश, 13 मुलींची सुटका

पुणे / हिंजवडी : पोलीसनामा ऑनलाइन –   हिंजवडीमध्ये ऑनलाईन सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी एका व्यक्तीला अटक करुन 13 मुलींची सुटका केली आहे. आरोपी ऑनलाईन माध्यमातून ग्राहकांचा शोध घेऊन वेश्या व्यवसाय चालवत होते. ही कारवाई गुरुवारी (दि.28) रात्री साडेनऊच्या सुमारास करण्यात आली.

अर्जुन प्रेम मल्ला (वय-36 रा. प्राइड रेसीडेन्सी, विमाननगर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तसेच त्याच्या इतर साथीदारांच्या विरोधात हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर महाराष्ट्र, आसाम राज्यातील एकूण 13 मुलींची सुटका करण्यात आली असून त्यांची रवानगी बालसुधारगृहामध्ये करण्यात आली आहे. आरोपी मुली पुरवून ग्राहकांकडून 8 ते 20 हजार रुपये घेत असल्याचे तपासात समोर आले आहे. सुटका करण्यात आलेल्या मुलींना बाणेर भागातील विविध ओयो हॉटेल, पी जीवर वास्तव्यास ठेवले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी एका बेवसाईटच्या माध्यमातून वेश्या व्यवसायासाठी फोन क्रमांक देत होते. ग्राहकांनी संपर्क केल्यानंतर मुलींचे फोटो पाठवत होते. मुलींचे फोटो पाठवण्यासाठी आरोपी व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करत होते. हिंजवडी पोलिसांनी देखील व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करुन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीकडून एक कार, मोबाईल फोन असा एकूण चार लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त आनंद भोईटे, वाकड विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, पोलिस निरीक्षक गुन्हे अजय जोगदंड, सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर काळे, पोलिस उपनिरीक्षक मुदळ, समाधान कदम, पोलिस हवालदार किरण पवार, नितीन पराळे, पोलिस नाईक विजय घाडगे, पोलिस शिपाई आकाश पांढरे, रवी पवार, पोलिस शिपाई सागर जाधव, ओम कांबळे, दत्तात्रय शिंदे, महिला पोलिस अंमलदार रेखा धोत्रे, पुनम आल्हाट, सुप्रिया सानप, भाग्यश्री जमदाडे, सोनाली ढोणे, तेजश्री म्हैशाळे यांच्या पथकाने केली.