Covid-19 : ‘कोरोना’च्या महामारी दरम्यान जनजीवन वेगानं सुरळीत करण्याचा प्रयत्न विनाशकारी होईल – WHO

जिनिव्हा : वृत्तसंस्था –   जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) अध्यक्षांनी इशारा दिला आहे की, कोरोना व्हायरस महामारीदरम्यान समाजाला इतक्या लवकर आणि वेगाने खुले करणे विनाशाचे कारण होऊ शकते. डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस अधनोम गब्रेयसस यांनी सोमवारी जोर देऊन म्हटले की, जे देश लॉकडाऊन खुले करण्याबाबत गंभीर आहेत, त्यांनी संक्रमण नियंत्रित करण्यासाठी गंभीर झाले पाहिजे. हे नियंत्रित करणे अशक्य नाही.

टेड्रोस यांनी देश, समाज आणि लोकांना चार गोष्टींवर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला, ज्यामध्ये मोठ्या आयोजनापासून बचाव करणे, सर्वात असुरक्षित लोकांचे रक्षण, स्वताचे रक्षण आणि संक्रमितांचा शोध घेणे आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचे विलगिकरण, तपासणी आणि संक्रमित आढळलेल्यांची योग्य देखभाल करणे याचा समावेश आहे.

डब्ल्यूएचओ प्रमुखांनी म्हटले की, नव्या सर्वेक्षणात समजले की, यामध्ये सहभागी 90 टक्के देशांमध्ये कोविड-19 मुळे अन्य आरोग्य सेवा अतिशय वाईट प्रकारे प्रभावित झाल्या आहेत. उल्लेखनीय म्हणजे कमी आणि मध्यम उत्पन्न असणार्‍या देशांच्या आरोग्य सेवांवर कोविड-19 च्या परिणामाचा आढावा घेण्यासाठी 105 देशांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले होते.

टेड्रोस यांनी म्हटले की, मार्च आणि जूनमध्ये पाच क्षेत्रात करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून खुलासा झाला की, सध्याच्या महामारीप्रमाणे आरोग्य आपत्तीला तोंड देण्यासाठी चांगल्या तयारीची गरज आहे.

सर्वेक्षणातून समजले की, 70 टक्के देशांमध्ये नियमित लसीकरण सर्वात जास्त प्रभावित झाले. यानंतर तपासणी आणि असंसर्गजन्य रोग जसे की हृदयरोग इत्यादीचे उपचार प्रभावित झाले. सुमारे एक चतुर्थांश देशांनी म्हटले की, महामारीमुळे आपत्कालिन आरोग्यसेवा प्रभावित झाली आहे.