नाणार विरोधकांचा राज ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची नाणार प्रकल्प समर्थकांनी भेट घेतली होती. त्याबाबत राज ठाकरे यांनी नाणार प्रकल्पाबाबत भूमिका मांडली होती. त्यावर आता कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र भडेकर यांनी मुख्यमंत्र्यांना लेटरबाजी करण्याचा प्लॅन शिजला व ही भेट एक आठवडा लांबणीवर पडली, असा गंभीर आरोप राज ठाकरे यांच्यावर केला आहे.

नाणार प्रकरणावरून अध्यक्ष रामचंद्र भडेकर यांनी मनसेवर गंभीर आरोप करत म्हटले आहे, नाणार प्रकल्पाचे समर्थक आणि RRPCL कंपनीचे अधिकारी मागील काही महिन्यांपासून राज ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. सुरुवातीला मनसेचे नेते अनिल शिदोरे हे RRPCL चे CEO बालासुब्रमण्यम अशोक आणि अनिल नागवेकर यांनी भेटले होते, असे प्रतिपादन भडेकर यांनी केले आहे. यानंतर नाणार प्रकल्पाचे समर्थक राज ठाकरे यांना २८ फेब्रुवारी रोजी भेटणार होते. मात्र मुख्यमंत्र्यांना लेटरबाजी करण्याचा प्लॅन शिजला व ही भेट एक आठवडा लांबणीवर पडली, असा आरोप त्यांनी केला आहे.

पुढे रामचंद्र भडेकर म्हणाले, स्थानिकांना विश्वासात न घेता, त्यांच्याशी चर्चा न करता केवळ कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या नादाला लागूनच अचानक दोन वर्षानंतर समर्थनाची डायरेक्ट भूमिका मांडणे हे सरळ सरळ विश्वासघातकी कृत्य आहे. त्यामुळे आम्ही नक्कीच दुःखावलो गेलो आहोत. आमच्या क्षमतेवर आमचा पूर्ण विश्वास असून कुणी कितीही प्रयत्न केला तरी रिफायनरी नाणार परिसरात येऊ देणार नाही, असं त्यांनी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

दरम्यान, राज ठाकरे म्हणाले होते, कोरोनोत्तर महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती द्यायची असेल तर’ रत्नागिरी राजापूर रिफायनरी’सारखा प्रकल्प हातातून गमावणं महाराष्ट्राला परवडण्यासारखं नाही, असे मत राज ठाकरे यांनी मांडले. तसेच मुख्यमंत्री यांच्यासह शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना रविवारी पत्र लिहून त्यांनी नाणार रिफायनरी संदर्भात सर्वांगाने विचार करण्याची गरज आहे अशी मागणी केली. तसेच आपल्या राज्यातील प्रकल्प इतर राज्यात जाता कामा नये. तेथील नागरिकांच्या काही समस्या नक्कीच असतील. परंतु यावर काहीतरी तोडगा काढण्याचा प्रयत्न करावा लागेल, असं राज ठाकरें यांनी नाणारवासीयांना सांगितलं. तसेच नाणारवासीयांनीआमचं ऐवढं काम मार्गी लावा, अशी मागणी राज ठाकरे यांच्याकडे केली.