CAA समर्थन मोर्चा : देवेंद्र फडणवीस ट्विटरवर चुकले रस्ता !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सुधारीत नागरिकत्व कायद्याच्या विरोधात आणि समर्थनात आज दोन मोर्चे मुंबईमध्ये निघाले. सुधारीत नागरिकत्व कायद्याविरोधातील मोर्चाचे आयोजन आझाद मैदानात करण्यात आले होते. तर, या कायद्याच्या समर्थनातील मोर्चाचे आयोजन ऑगस्ट क्रांती मैदानात करण्यात आले होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कायद्याच्या समर्थनातील मोर्चात सहभागी झाले. मात्र, आपण आझाद मैदानात दाखल झालो असल्याचे ट्विट त्यांनी केले आणि चर्चांना उधाण आले.

Fadanvis Tweet

देवेंद्र फडणवीस यांनी केलेले ट्विट लगेच व्हायरल झाले. आज सायंकाळी ऑगस्ट क्रांती मैदानात भाजप व इतर संघटनांकडून सुधारीत नागरिकत्व कायद्याच्या समर्थनात जाहीर सभा घेण्यात आली. सुरुवातीला ऑगस्ट क्रांती मैदान ते गिरगाव चौपाटी असा मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र, पोलिसांनी परवानगी नाकारल्याने मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. यावर देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांवर निशाणा साधत सरकारवर टीका केली.

पूर्वकार्यक्रमानुसार फडणवीस सभेसाठी उपस्थित झाले. मात्र, त्यांच्या एका ट्विटने गोंधळ उडाला. देवेंद्र फडणवीस यांनी आपण आझाद मैदानात दाखल झालो असल्याचे ट्विट केले. मात्र, युजर्सच्या ही चूक लक्षात आणून दिल्यानंतर थोड्याच वेळात त्यांनी आपले ट्विट डिलीट केले. मात्र, तोपर्यंत फडणवीस यांनी केलेले ट्विट प्रचंड व्हायरल झाले. तर काहींनी ट्विटचे स्क्रिन शॉट काढून ते सोशल मीडियावर व्हायरल केले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/