‘तो’ पर्यंत विरोधी पक्षानं नाकावरचा ‘मास्क’ तोंडात ‘बोळा’ म्हणून वापरावा, ‘सामना’तून भाजपातील उपर्‍यांचा ‘समाचार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – फडणवीस यांना राज्य चालविण्याचा अनुभव आहे व उद्धव ठाकरे यांना आहे की नाही हे महाराष्ट्राची जनता ठरवेल, भाजपातील उपर्‍यांना हा अधिकार कोणी दिला ? महाराष्ट्रात सीबीआय, ईडी वगैरेतून निर्माण झालेला सूडाचा विषाणू ठाकरे सरकारने मारला तसा कोरोना विषाणू मारला जाईल. तोपर्यंत विरोधी पक्षाने नाकावरचा मास्क तोंडात बोळा म्हणून वापरावा, हे बरे ! अशा शेलक्या शब्दात सामना तून संजय राऊत यांनी भाजपमधील उपर्‍यांचा समाचार घेतला आहे. कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री हवे होते, असे वक्तव्य भाजपामध्ये आलेल्या काहींनी करायला सुरुवात केली होती. त्यांना सामन्यातील अग्रलेखातून टोला हाणण्यात आला आहे.

कोरोनाशी लढण्यात मोदी यांचा अनुभव कमी, त्यामुळे पुन्हा अनुभवी डॉ. मनमोहन सिंग यांनाच आणा, असे कोणी म्हटले तर काय होईल ? कोरोनाचे सोडा, देशाची अर्थव्यवस्था सध्या साफ कोसळली आहे. मग ती सावरण्यासाठी निष्णांत अर्थतज्ञ असलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांची देशाला गरज आहे, असे कोणाला वाटले तऱ. आता फडणवीस हवे होते असा प्रचार करणे म्हणजे मढ्यावरचे लोणी खाणेच आहे.

महाविकास आघाडी सरकारात कुरबुरी नाहीत. फाटाफुटीचा कोराना व्हायरस येथे कधीच मेला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता मैदानात उतरले आहेत ते महाराष्ट्र विषाणूमुक्त करण्यासाठी. फडणवीस यांनी वेगळे काय केले असते. फडणवीस सरकारने या आरोग्य आणीबाणीचा एखादा राजकीय इव्हेंट केला असता, दुसरे काय केले असते. तसेच कोरोना विषाणू गिळून त्यांनी ढेकर दिली असती की त्या विषाणूच्या मागे सीबीआय, ईडी वगैरे लावून या व्हायरसची बोलती बंद केली असती? महाराष्ट्रात सीबीआय, ईडी वगैरेतून निर्माण झालेला सूडाचा विषाणू ठाकरे सरकारने मारला तसा कोरोना विषाणू मारला जाईल.

उद्धव ठाकरे यांना प्रशासनाचा अनुभव शुन्य असल्याने आता महाराष्ट्राला म्हणे पुन्हा अनुभव संपन्न देवेंद्र फडणवीसांची गरज आहे, हे सर्व कोण सांगते आहे?. तर ज्यांनी सारी हयात काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या पखाल्या वाहिल्या व नंतर हवा पाणी बघून भाजपात उड्या मारल्या ते असे बेडूक जर फडणवीस यांच्यासाठी ही कोरोना मोहीम राबवीत असतील तर महाराष्टाच्या माजी मुख्यमंत्र्यांवर काय ही वेळ आली, काय हे त्यांचे अंध:पन झाले असेच विचारावे लागेल. भाडोत्री भगतगणाचे क्वारंटाईन फडणवीस यांनी केले नाही तर त्यांची उरली सुरली पतही लयास जाईल.