वाघीरे महाविद्यालयात महिला दिनानिमित्त ‘महिला सबलीकरण’ कार्यशाळेचे आयोजन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन : (चंद्रकांत चौंडकर) –  पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाघीरे महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘महिला सबलीकरण’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बाबाराजे जाधवराव यांच्या हस्ते झाले . या कार्यशाळेत लक्ष्मीदीदी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नितीन घोरपडे होते.

भारतीय स्त्रियांमध्ये संस्कार आणि सृजनाचा आविष्कार आहे . तिच्या मध्ये सृजनशीलता, सहनशीलता, नावीन्यता हे गुण निसर्गतःच आहेत. ती सृजनशील आहे. कारण निसर्गाने निर्मितीचा अधिकार स्त्रियांना दिला आहे. स्त्री मुळातच सबला आहे. भारतीय संस्कृतीही स्त्रीशक्तीला वंदन करणारी व स्त्री प्रधान आहे असे प्रतिपादन लक्ष्मीदीदी यांनी केले.

आज जीवनाच्या सर्वच क्षेत्रांमध्ये महिला उल्लेखनीय कामगिरी करीत आहेत. स्त्रीशक्तीच्या रूपातील मनुष्यबळ विकसित करून स्त्रियांना आरोग्य, शिक्षण, संस्कार व स्वालंबन या बाबतीत सशक्त बनविणे ही समाजाची जबाबदारी आहे. असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना व्यक्त केले.

बाबाराजे जाधवराव म्हणाले, समाजाची प्रगती साधायची असेल तर महिला सक्षमीकरण अत्यावश्यक आहे. महिला सक्षमीकरणासाठी समाज, देश आणि महिलांनी एकत्रित प्रयत्न केले पाहिजे.

महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांनी महाविद्यालयातील सर्व महिला कर्मचाऱ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. या प्रसंगी कार्यक्रम अधिकारी डॉ. किशोर लिपारे, डॉ.विद्या पाटणकर आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. एम.एस.ताकवले यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.अर्चना जाधव यांनी केले तर आभार प्रा. आर. डी. गोलांडे यांनी मानले.