साहित्य संमेलनाचा मार्ग सुकर ; उस्मानाबादकरांच्या आदरातिथ्याने महामंडळ समिती भारावली !

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – उस्मानाबादकरांचे आदरातिथ्य आणि पाहुणचाराने महामंडळाची स्थळ पाहणी समिती चांगलीच भारावून गेली. उस्मानाबादचे गुलाब जामुन आणि शेंगदाण्याच्या चटणीची चव जिभेवर अजूनही रेंगाळत आहे. त्यामुळे महामंडळाच्या स्थळ पाहणी समितीचे मत उस्मानाबादविषयी अनुकूल होत आहे. आता यंदा निराशा होऊ देणार नाही. महामंडळाच्या शुभेच्छा आपल्या सोबत आहेत. अशा सूचक शब्दात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी उस्मानाबादच्या साहित्य संमेलनाचा मार्ग सूकर असल्याचे संकेत दिले.

आगामी ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्थळ निश्चितीसाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची स्थळ निवड समिती मंगळवार, १७ जुलै रोजी उस्मानाबाद शहरात दाखल झाली. शहरातील विविध मैदाने आणि निवासाच्या सोयी-सुविधांची पाहणी केल्यानंतर बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या जाहीर बैठकीत उस्मानाबादला साहित्य संमेलन मिळण्यासाठी आपण अनुकूल प्रयत्न करणार असल्याचे ठाले पाटील यांनी जाहीर केले. यावेळी मंचावर महामंडळाच्या उपाध्यक्ष विद्या देवधर, कार्यवाह डॉ. दादा गोरे, कोषाध्यक्ष प्रा. रामचंद्र काळुंखे, सदस्य प्रतिभा सराफ, प्रदीप दाते, प्रकाश पायगुडे, भालचंद्र शिंदे, कुंडलिक अतकरे, किरण सगर यांच्यासह जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक आर. राजा, उपजिल्हाधिकारी संतोष राऊत, मराठवाडा साहित्य परिषदेचे उस्मानाबाद शाखाध्यक्ष नितीन तावडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

उस्मानाबाद येथील मराठवाडा साहित्य परिषदेच्या शाखेने मागील १० वर्षांत लक्षवेधी काम केले आहे. जिल्ह्यातील सर्व संस्था, संघटनांना विश्वासात घेऊन त्यांनी निर्माण केलेले सर्व समावेशक वातावरण संमेलन यशस्वीतेसाठी पूरक आहे. सध्या आर्थिकदृष्ट्या आणि साहित्यीक भूमिका याबाबत संमेलनातील आचारसंहितेत बिघाड झाले आहेत. आगामी साहित्य संमेलनापासून त्यात काटेकोरपणे दुरूस्ती करण्याचा प्रयत्न केला जाईल. उस्मानाबादकरांची मागणी मागील पाच वर्षांपासून सातत्याने सुरू आहे. त्यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम दुर्लक्षित करता येणार नाहीत. त्यामुळे उस्मानाबादला साहित्य संमेलन मिळावे यासाठी आपण अनुकूल प्रयत्न करणार असल्याचे ठाले-पाटील यांनी सांगितले. स्थळ पाहणी समितीचा अहवाल लवकरच महामंडळाकडे सादर केला जाईल. त्यानंतर महामंडळातील सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन संमेलनाचे स्थळ जाहीर केले जाईल. उस्मानाबादकरांना त्यासाठी आपल्या शुभेच्छा आहेत, अशा सूचक शब्दात ठाले पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील आणि नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून सर्व पातळीवर सहकार्य करणार असल्याचे सांगितले. संमेलनासाठी पोलीस प्रशासन देखील शक्य तेवढी मदत करील, अशा शब्दात जिल्हा पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, महेश पोतदार, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय मंत्री, माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर, इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. अभय शहापूरकर, नाट्य परिषदेचे उस्मानाबाद शाखाध्यक्ष विशाल शिंगाडे यांनी उस्मानाबादकरांच्या वतीने आपल्या भावना व्यक्त केल्या.

प्रास्ताविकपर मनोगतात नितीन तावडे यांनी, मागील पाच वर्षांपासून साहित्य संमेलनाच्या यजमानपदासाठी सातत्याने केलेल्या पूर्वतयारीची वस्तुनिष्ठ माहिती सर्वांसमोर मांडली. विविध संस्था, संघटना, शासन, प्रशासन आणि राजकीय पदाधिकार्‍यांच्या सहकार्यातून हे साहित्य संमेलन ऐतिहासिक करण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रत्येक नागरिक उत्साही असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी जिल्ह्यातील शंभरहून अधिक संस्था, संघटनांनी लेखी स्वरूपात साहित्य संमेलन मागणीचे ठराव आपल्याकडे दिले असल्याचेही तावडे यांनी सांगितले. सूत्रसंचालन रवींद्र केसकर यांनी तर आभार कमलताई नलावडे यांनी मानले. यावेळी विविध पक्ष, संघटना, संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सदस्य यांच्यासह साहित्यरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या ठिकाणांची केली पाहणी

आगामी ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मुख्य मंडपासाठी शहरातील दोन मैदानांची पाहणी स्थळ निवड समितीने केली. छत्रपती संभाजीराजे चौपाटीच्या मागे असलेल्या मैदानाला महामंडळाच्या पाहणी समितीने हिरवा कंदील दिला आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या मैदानात ग्रंथ दालन थाटण्यासाठी पुरेशी जागा असल्याचे मत समितीने नोंदविले आहे. त्याचबरोबर मुख्य सभामंडपाबरोबरच इतर सभा मंडपांसाठी पुष्पक मंगल कार्यालय, परिमल मंगल कार्यालय आणि रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाच्या परिसराची पाहणी करण्यात आली.

उस्मानाबादकरांचे स्वप्न नजरेच्या टप्प्यात

तुळजाभवानीचे शक्तीपीठ आणि संत गोरोबाकाकांचे भक्तीपीठ, अशी ओळख असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्याला पहिल्यांदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्याचा मान मिळणार आहे. उस्मानाबाद जिल्ह्याच्या सांस्कृतिक घडामोडीतील ही ऐतिहासिक बाब असल्यामुळे उस्मानाबादकर त्यासाठी उत्स्फुर्तपणे योगदान देण्यास तयार आहेत. साहित्य महामंडळाच्या स्थळ निवड समितीने सकारात्मक संकेत दिल्यामुळे उस्मानाबादकरांच्या साहित्य संमेलनाबाबतच्या आशा उंचावल्या आहेत. त्यामुळे मागील पाच वर्षांपासून पाहिलेले साहित्य संमेलनाच्या यजमानपदाचे स्वप्न आता नजरेच्या टप्प्यात आले असल्याची भावना सामान्य उस्मानाबादकर उपस्थित करीत आहेत.

दुखणे कमी करण्यासाठी औषधांशिवाय ‘हे’ उपायदेखील लाभदायक

सुगंधाने सुधारेल आरोग्य, एरोमॅटिक थेरपी करून पाहा

 ‘हे’ २२ सोपे घरगुती उपाय केल्यास त्वरित उजळेल चेहरा

‘किडनी’ फेल्युअर होऊ नये म्हणून करा ‘या’ उपाययोजना

‘अंडरआर्म डार्कनेस’ दूर करण्याचे ९ घरगुती रामबाण उपाय

 तजेलदार त्त्वचेसाठी ‘टोमॅटो’ उपयोगी, जाणून घ्या सामान्य गोष्टींचे ‘खास गुण’

‘या’ ५ सवयी लावून घ्या, तुम्ही वारंवार पडणार नाहीत आजारी

भाज्यांच्या सालीमध्ये सुद्धा असतात औषधी गुण, करा ‘हे’ उपाय