जि.प. निवडणूक : उस्मानाबादमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या आमदार समर्थकाचा विजय

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – उस्मानाबाद जि.प. निवडणूकीमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या समर्थक अस्मिता कांबळे या अध्यक्षपदी तर तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत उपाध्यक्षपदी 30 विरुद्ध 23 मतांनी विजयी झाले आहेत. राणा जगजितसिंह पाटील यांना शह देण्यासाठी महाविकास आघाडी कामाला लागली होती मात्र शिवसेनेत उभी फूट पडल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत.

खासदार ओमराजे निंबाळकर यांना हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीत तानाजी सावंत यांच्या गटाने भाजपला मदत केल्याने मोठी उलथापालथ झाली आहे. अध्यक्षपदी भाजप समर्थक अस्मिता कांबळे तर शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत 30 विरुद्ध 23 मतांनी विजयी झाले आहे. महाविकास आघाडीचा फॉर्म्युला उस्मानाबादमध्ये फोल ठरला आहे. त्याचे कारण म्हणजे शिवसेनेत उभी फूट पडली होती.

उमरगा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांच्या समर्थकांनी राणा पाटील म्हणजेच भाजपच्या उमेदवाराना पाठिंबा दिल्याची माहिती मिळतीय. त्या बदल्यात स्वतःच्या पदरात उपाध्यक्षपद मिळवले. त्यामुळे राणा पाटील यांचे कट्टर विरोधक मानले जाणारे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना हा मोठा धक्का मानला जातोय. तानाजी सावंत यांना मंत्री पद न मिळाल्याने त्यांनी ही भूमिका घेतल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. त्यामुळे आगामी काळात तानाजी सावंत काय निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/