‘कोरोना’ व्हायरसनं ‘या’ देशातील सर्व ‘रेकॉर्ड’ मोडले, एकाच दिवसात 33274 ‘नवीन’ प्रकरणांची ‘नोंद’

ब्राझील : वृत्तसंस्था – जगात कोरोना विषाणूने थैमान घातले असून कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. अमेरिकेनंतर कोरोना विषाणूमुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या देशांच्या यादीत ब्राझील दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. कोरोना विषाणूने शनिवारी (दि.30) ब्राझीलमधील सर्व विक्रम मोडीत काढले आहे. ब्राझिलमध्ये एकाच दिवसात तब्बल 33 हजाराहून अधिक नवीन प्रकरणे समोर आल्याने अध्यक्ष जॅर बोलसोनारो यांची चिंता वाढली आहे.

ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी प्राणघात कोरोना विषाणूची 33 हजार 274 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. या व्यतिरिक्त कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येत ब्राझिलने फ्रान्सला देखील मागे टाकले आहे. युनायटेड स्टेट्स, ब्रिटन आणि इटली या देशानंतर ब्राझिलचा नंबर लागतो.

दक्षिण अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्या लोकांची संख्या 4 लाख 97 हजार 440 झाली आहे. संक्रमणाच्या बाबतीत केवळ ब्राझील अमेरिकेच्या मागे आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची सख्या 17 लाखापेक्षा जास्त झाली असून मृतांची संख्या एक लाखाच्या पुढे आहे.

ब्राझील मंत्रालयाने म्हटले आहे की, कोरोना विषाणुमुळे होणारा श्वसनाचा आजार झपाट्याने वाढत आहे. यामुळे आजारी लोकांची संख्या वाढून 28 हजार 834 इतकी झाली आहे. दरम्यान, मागील 24 तासात 956 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ब्राझिलियन आरोग्य तज्ज्ञांनी इशारा देऊनही क्वारंटाईनचे प्रतिबंध कमी करण्यात येत आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, यामुळे देशात सर्वाधिक खराब परिस्थिती येणार आहे. ब्राझीलमधील लॉकडाऊनवर टीका करताना राष्ट्राध्यक्ष जायर बोलोनारो यांनी म्हटले की, यामुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढेल.