19 वर्षांपूर्वी ‘या’ दिग्गज नेत्यालाही चिदंबरमप्रमाणे CBI नं केलं होतं अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणात माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना अखेर बुधवारी दिवसभराच्या नाट्यपूर्ण घडामोडींनंतर रात्री दहा वाजता सीबीआयने अटक केली. त्यांची सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी रात्रीच चौकशी केली. त्यांना आज राउज ऐवेन्यू येथील सीबीआय कोर्टात हजर केले जाणार आहे. चिदंबरम हे दक्षिण भारतातील दुसरे नेते आहेत ज्यांना सीबीआयने जबरदस्तीने ताब्यात घेतले आहे. 2001 साली असेच प्रकरण गाजले होते.  दक्षिण भारतातील मोठे नेते आणि माजी मुख्यमंत्री करुणानिधी यांना 30 जूनच्या रात्री अटक केली होती.

30 जून 2001 च्या रात्री तामिळनाडूचे माजी सीएम करुणानिधी चेन्नईत त्यांच्या घरात झोपले होते, तेव्हा पोलीस त्यांच्या घरी येऊन धडकले. रात्री दीड वाजता पोलिसांनी त्यांच्या रूमचा दरवाजा तोडून त्यांच्या रूममध्ये प्रवेश केला होता आणि त्यांना घातलेल्या कपड्यांसह त्याच्याबरोबर चालण्यास सांगितले. तसेच त्यांनी कुणालाही कॉल करु नये म्हणून पोलिसांनी घरातल्या सर्व फोन लाईन्स कापल्या होत्या.

रात्री दीड वाजता करुणानिधींनी पोलिसांसोबत जाण्यास नकार दिला असता पोलिसांनी त्यांना जबरदस्तीने बेडवर ओढून, ढकलून व मारहाण करुन आपल्या सोबत नेले होते. त्यावेळी चिदंबरम यांच्या कार्यकर्त्यांप्रमाणेच करुणानिधी यांच्या कार्यकर्त्यांनीही त्यांच्या घराबाहेर निषेध नोंदवला होता परंतु पोलिसांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले होते.

माजी सीएम करुणानिधी यांच्यावर मिनी उड्डाणपुलांच्या बांधकामात अनियमिततेचा आरोप होता. त्यामुळे सरकारी तिजोरीचे 12 कोटी रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणात पोलिसांनी 29 जून रोजी रात्री नऊच्या सुमारास तक्रार दाखल केली होती आणि मुख्यमंत्री जयललिता यांच्या आदेशानुसार करुणानिधी यांना  अटक करण्यासाठी पोलीस त्यांच्या घरी पोहचली होती.

दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर चिदंबरम हे बेपत्ता झाले होते. रात्री नाट्यमयरित्या ते काँग्रेसच्या मुख्यालयात अवतरले. त्यांच्या वकिलांसोबत पत्रकार परिषद घेऊन स्वत:वरील आणि मुलावरील सर्व आरोप फेटाळून लावले. अवघ्या सात मिनिटांच्या पत्रकार परिषदेनंतर चिदंबरम काँग्रेस कार्यालयातून निघून थेट त्यांच्या घरी गेले. चिदंबरम काँग्रेस मुख्यालयातून घरी गेल्याचे कळताच सीबीआयच्या पथकाने दिल्लीतील जोरबाग येथील त्यांचे निवासस्थान गाठले. मात्र, चिदंबरम यांच्या घराचा दरवाजा उघडला जात नसल्याने सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी गेटवरून उड्या मारून त्यांच्या घरात प्रवेश केला आणि त्यांना ताब्यात घेतले.

आरोग्यविषयक वृत्त –