पाकिस्तानी सेनेनं ‘आंतरराष्ट्रीय’ दहशतवाद्यांशी वाढवल्या ‘भेटीगाठी’ अन् ‘सवांद’, भारतीय सेनेला ‘सतर्क’तेचा इशारा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नियंत्रण रेषेवर भारतीय सैन्याच्या हातून मार खाऊन आता पाक राज्यकर्त्यांनी दहशतवाद्यांशी हात मिळवणी सुरु केली आहे. या पार्श्ववभूमीवर जम्मू-काश्मीर आणि गुजरातच्या सीमावर्ती भागातील सुरक्षा अधिक मजबूत करण्यात आली आहे. दहशतवाद्यांच्या मदतीने पाकिस्तान भारतात मोठ्या हल्ल्याची कारवाई करण्याच्या तयारीत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, २७ डिसेंबर रोजी पाकिस्तान लष्कराच्या ‘पब्लिसिटी स्टंटबाज’ मेजर जनरल आसिफ घफूर यांनी कराचीमध्ये जामिया रशिडिया मदरसा येथे भेट दिली. जामिया रशिडिया मदरसा जैश-ए-मोहम्मदशी संबंधित आहे आणि सय्यद सलाउद्दीन अनेक वेळा या विद्यालयात गेला आहे. इतकेच नव्हे तर २००२ च्या अपहरण आणि वॉल स्ट्रीट जर्नलच्या पत्रकार डॅनियल पर्ल यांच्या हत्येशी या मदरशाचे नाव जोडले गेले होते. या घटनेनंतर संयुक्त राष्ट्र आणि अमेरिकेने त्यास दहशतवादी संघटना घोषित केले.

जनरल आसिफ गफूर यांनी या भेटीसंदर्भात कोणतीही सार्वजनिक पोस्ट केली नव्हती, परंतु जामिया रशिडिया मदरशामध्ये बर्‍याच लोकांनी त्याचा फोटो विद्यार्थ्यांमध्ये शेअर केला. या मदरशाची स्थापना मुफ्ती मोहम्मद रशीद याने केली होती. तसेच या महिन्याच्या सुरूवातीला पाकिस्तान रेंजर्सच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अहले सुन्नत वल जमातचे प्रमुख औरंगजेब फारुकी याची भेट घेतली. अहले सुन्नत वल्ल जमात हा पाकिस्तानच्या कुप्रसिद्ध सिपह-ए-सहाबा पाकिस्तानचा एक भाग आहे. ही संघटना पाकिस्तानमधील शेकडो शिया अल्पसंख्यांकांच्या हत्येत सहभागी आहे.

वॉल स्ट्रीट जर्नलचे रिपोर्टर डॅनियल पर्ल यांचा मृतदेह मे २००२ मध्ये जामिया रशिडिया मदरशाच्या ५०० मीटर अंतरावर असलेल्या अल रशीद ट्रस्टच्या मालकीच्या जागेत असलेल्या कबरेत सापडला. असे मानले जाते की या मदरसाचा संबंध अल कायदाशी आहे.

सिपाह-ए-सहाबा पाकिस्तानवर २००२ मध्ये माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांनी बंदी घातली होती. यानंतर या संस्थेने आपले नाव अहले सुन्नत वाल जमात असे बदलले पण २०१२ मध्ये पाकिस्तान सरकारनेही त्यावर बंदी घातली. सध्या हे दोन्ही गट राष्ट्रीय काउंटर टेररिझम ऑथॉरिटीच्या यादीमध्ये आहेत. मात्र, त्यांना पाकिस्तानी लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र, याबाबत भारताने दक्षता वाढविली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/