Coronavirus in Pakistan : ‘कोरोना’चा हाहाकार ! एक लाखाच्या जवळ पोहचला संक्रमितांचा आकडा, आतापर्यंत 2000 हून जास्त मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानमध्ये कोरोना विषाणू संक्रमित रुग्णांची संख्या जवळपास एक लाखांच्या आसपास पोहोचली आहे आणि आतापर्यंत २००० हून अधिक मृत्यू झाले आहेत. देशाच्या आरोग्य मंत्रालयानुसार, गेल्या २४ तासांत ४,९६० नवीन रुग्णांची नोंद झाली आहे आणि ६७ लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात ९८,९४३ प्रकरणे समोर आली आहेत आणि २,००२ लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत ३३,४६५ रूग्ण बरे झाले आहेत.

एका वृत्तसंस्थेनुसार, पंजाबमध्ये आतापर्यंत ३७,०९० प्रकरणे, सिंधमध्ये ३६,३६४, खैबर-पख्तूनख्वा मध्ये १३,००१, बलुचिस्तानमध्ये ६,२२१, इस्लामाबादमध्ये ४,९७९, गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये ९२७ आणि गुलाम काश्मीरमध्ये (पीओके) ३६१ प्रकरणे समोर आली आहेत.

कठोर लॉकडाऊन लागू करण्यास नकार
देशात वेगाने वाढणार्‍या प्रकरणांमध्ये पंतप्रधान इम्रान खान यांनी व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी कडक लॉकडाऊन लागू करण्यास नकार दिला. ते म्हणाले की, असे केल्याने देशाची अर्थव्यवस्था खालावेल आणि गरिबी वाढेल. एका वृत्तसंस्थेनुसार, पंतप्रधान खान यांनी शनिवारी महामारीची गंभीरता आणि प्रमाणित कार्यप्रणाली (एसओपी) चे काटेकोरपणे पालन करण्याच्या आवश्यकतेबाबत जनजागृती करण्याचे आव्हान केले.

नवीन प्रकरणांत वाढ
या आठवड्याच्या सुरुवातीस इम्रान खान यांनी लोकांचे जीवन, विशेषत: रोजंदारीवरील कामगारांना वाचवण्यासाठी लॉकडाऊन शिथिल करत अर्थव्यवस्थेची अधिक क्षेत्रे पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले. मात्र तेव्हापासून नवीन प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे.

जगभरात जवळपास चार लाख लोकांचा मृत्यू
जगभरात कोरोना संक्रमणामुळे सुमारे चार लाख लोकांचा मृत्यू झाला आहे आणि ६४ लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. याचा सर्वाधिक परिणाम अमेरिकेत झाला आहे. येथे १९ लाखाहून अधिक प्रकरणे समोर आली आहेत आणि १ लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.