कराचीमध्ये आणखी एक प्राचीन हनुमान मंदिर ‘उद्धवस्त’, 20 हिंदू कुटुंबांच्या घरांवर ‘बुलडोझर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा अल्पसंख्यांक हिंदूंच्या भावनेला धक्का पोचला आहे. पाकिस्तानच्या कराचीमधील ल्यारी येथे एक प्राचीन हनुमान मंदिर पाडण्यात आले आहे. मंदिराजवळ राहणाऱ्या सुमारे २० हिंदू कुटुंबांची घरे देखील बुलडोझरने जमीनदोस्त केली गेली. तुर्कीची राजधानी इस्तंबूलमध्ये ऐतिहासिक चर्चचे मशिदीत रूपांतर होत असताना पाकिस्तानमध्ये ही घटना घडली. एकाच वेळी दोन्ही धार्मिक स्थळे पाडण्यात आली. याबद्दल पाकिस्तानमधील अल्पसंख्यांक हिंदूंमध्ये संताप आहे.

हिंदूंच्या विरोधानंतर परिसर सील
हिंदूंच्या निषेधानंतर पोलिसांनी हा परिसर सील केला आहे. एका वृत्तपत्रानुसार, ल्यारीचे सहाय्यक आयुक्त अब्दुल करीम मेमन यांनी मंदिर उध्वस्त करणाऱ्या बिल्डरविरूद्ध चौकशीचे आदेश दिले आहेत. स्थानिक लोकांनी सांगितले की, एका बिल्डरने कथितपणे मंदिराच्या आजूबाजूची जमीन विकत घेतली होती. या परिसरात बिल्डरला निवासी कॉम्प्लेक्स बांधायचा होता. स्थानिक लोकांनी सांगितले की, बिल्डरने हिंदूंना आश्वासन दिले होते कि मंदिर पाडले जाणार नाही. मात्र कोरोना विषाणूमुळे लोक घरात बंद होते, तेव्हा त्याने संधीचा फायदा घेऊन मंदिर नष्ट केले.

समिती करत आहे तपास, सात दिवसात देईल अहवाल
धक्कादायक बाब म्हणजे दक्षिण कराचीचे उपायुक्त इरशाद अहमद सोधर यांनी सांगितले की, यापूर्वी येथे दोन मंदिरे होती, परंतु एक मंदिर आधीच पाडले गेले होते. उपायुक्तांनी हिंदू कुटुंबाला न्याय देण्याचे आश्वासन दिले. ते म्हणाले की, या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती गठित केली गेली आहे. या चौकशी समितीमध्ये एक पुरातत्वशास्त्रज्ञ देखील समाविष्ट आहे. ते म्हणाले की, समिती सात दिवसांत आपला अहवाल सादर करेल. त्यानंतर ते पुन्हा म्हणाले की, लोकांना न्याय दिला जाईल.

स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानमधून शेकडो मंदिरे गायब झाली आहेत
पाकिस्तानात अल्पसंख्याकांच्या धार्मिक स्थळांचा विध्वंस आणि धर्मांतर ही काही नवीन गोष्ट नाही. जवळजवळ प्रत्येक महिन्यात एक नवीन वाद होतो. पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांक संस्कृती आणि त्याची चिन्हे यांच्या स्वीकृतीबाबत निराशाच मिळाली आहे. अल्पसंख्याकांविरूद्ध हा द्वेष पूर्ण देशभरात आहे. अल्पसंख्यक विशेषत: हिंदूंविरूद्ध द्वेष समाजात तीव्र झाला आहे. स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानमधील शेकडो मंदिरे गायब झाली आहेत. या मंदिरांच्या जागी बऱ्याच इमारती आणि मशिदी बांधल्या गेल्या आहेत. जूनमध्ये पंतप्रधान इम्रान खान यांनी आपली धर्मनिरपेक्षता सिद्ध करण्यासाठी इस्लामाबादमध्ये कृष्ण मंदिर बांधण्यासाठी निधीची तरतूद केली, पण काही दिवसातच मंदिराची सीमा भिंत पाडली गेली.