रात्री उशिरा अंधारात बुडाले पाकिस्तान, इस्लामाबाद ते लाहोर पर्यंत बत्ती गुल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  आर्थिक संकटाचा सामना करत असलेला पाकिस्तान(Pakistan)  आपल्या देशवासीयांना वीजपुरवठा करण्यातही अपयशी ठरत आहे. तांत्रिक त्रुटींमुळे शनिवारी रात्री उशिरा संपूर्ण पाकिस्तानमध्ये वीज गेली. राष्ट्रीय राजधानी इस्लामाबाद, लाहोर, कराची, रावळपिंडी आणि मुलतानसह महत्त्वाची शहरे पूर्णपणे अंधारात बुडाली. बऱ्याच संघर्षानंतर रविवारी सकाळी काही प्रमुख शहरांना अंशतः वीजपुरवठा झाला. ऊर्जामंत्री ओमर अयूब खान म्हणाले की, तांत्रिक पथक वीजपुरवठा पूर्णपणे पूर्ववत करण्याच्या प्रयत्नात गुंतले आहे. माहितीमंत्री शिबली फराज यांच्यासह ऊर्जामंत्री खान म्हणाले की, सिंध प्रांतातील गुड्डू पॉवर प्लांटमधील तांत्रिक बिघाडामुळे रात्री 11:41 वाजता देशभरात ब्लॅकआऊट झाले. ते म्हणाले की, ज्यावेळी पुरवठा बंद झाला त्यावेळी 10,320 मेगावॅट वीज ग्रीडमध्ये दिसत होती. हिवाळ्यामध्ये संपूर्ण देशासाठी एवढी वीज पुरेशी आहे.

ऊर्जामंत्री म्हणाले की, तांत्रिक बिघाड झाल्यानंतर पॉवर प्लांट सेफ्टी सिस्टम आपोआप बंद होऊ लागले. संपूर्ण परिस्थिती पंतप्रधान इम्रान खान यांना कळविण्यात आली आहे. ते म्हणाले की, अद्याप ब्लॅकआउटचे खरे कारण आणि वीज प्रसारण यंत्रणेची वारंवारिता 50 वरून शून्यावर कशी आली हे समजू शकलेले नाही. गुडु पॉवर प्लांटमधून तीन प्रमुख पुरवठा लाईन जातात आणि अद्याप हे समजले नाही कि सर्वात आधी कोणत्या लाईनची फ्रिक्वेन्सी कमी झाली. यापूर्वी इस्लामाबादचे उपायुक्त हमजा शफाकत यांनी ट्वीट केले होते की, “नॅशनल ट्रान्समिशन डिस्पॅच कंपनीची लाईन ट्रिप झाली आहे. ज्यामुळे तेथे ब्लॅकआउट झाले. परिस्थिती सामान्य होण्यास थोडा वेळ लागेल.

नवाज शरीफ सरकारवर आरोप

देशात ब्लॅकआऊट होण्याबरोबरच राजकीय आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरु झाले. यासाठी माहितीमंत्री शिबली फराज यांनी जुन्या ट्रान्समिशन सिस्टमला जबाबदार धरले. ऊर्जामंत्री म्हणाले की, 2013-18 मध्ये पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज यांच्या सरकारच्या काळात संपूर्ण देशांत ब्लॅकआऊट झाले होते.

ट्विटरवर ट्रेंड झाले हॅशटॅगब्लॅकआउट

अचानक झालेल्या या ब्लॅकआऊटमुळे सोशल मीडियावर बरीच अफवा पसरली. ब्रेकडाउन नंतर लवकरच ट्विटरवर हॅशटॅग ब्लॅकआउट टॉपवर ट्रेंड झाला. त्याअंतर्गत रविवारी पहाटेपर्यंत 52,800 हून अधिक ट्वीट झाले. एका वापरकर्त्याने लिहिले, शेवटी इम्रान खानने नवीन पाकिस्तानला नाईट मोडमध्ये आणले. त्याच वेळी एका वापरकर्त्याने लिहिले की यावेळी व्हेंटिलेटरवर असलेल्या सर्व लोकांसाठी प्रार्थना करा.