नुकत्याच सत्तेवर आलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांना एक संधी द्यावी

श्रीनगर : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४० जवान शहीद झाले. जम्मू-काश्मीर मधील पुलवामा हल्ल्यानंतर भारत आक्रमक झाला आहे. मात्र पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांना एक संधी द्यायला हवी, असे वक्तव्य काश्मिरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी केले आहे.

मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या की , ‘पठाणकोट हल्ल्यानंतर इम्रान खान यांनी गुन्हेगारांना शिक्षा द्यायला हवी होती. पण, त्यांनी तसे केले नाही. तरी सुद्धा त्यांना एक संधी द्यायला हवी. ते आताच सत्तेवर आले आहेत. पाकिस्तानसोबत चर्चा झाली पाहिजे. ‘

इम्रान खान यांची प्रतिक्रिया –

पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज प्रथमच प्रतिक्रिया दिली. इम्रान खान यांनी पुलवामा हल्लात पाकिस्तानचा हात असल्याचा दावा फेटाळून लावला. हा हल्ला करून पाकिस्तानला काय फायदा, असा प्रश्नही खान यांनी विचारला. आम्हाला स्थैर्य हवे आहे. ज्या देशाला स्थैर्य हवे, तो अशा कारवाया करणार नाही, असे खान म्हणाले.

इम्रान खान यांची भारताला धमकी –

इम्रान खान म्हणाले की, ‘पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे. पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक केली पाहिजे, अशा चर्चा सुरू आहेत. चालू वर्ष हे भारतामध्ये निवडणुकीचे वर्ष आहे. त्यामुळे पाकिस्तानवर हल्ला केल्यास सत्ताधाऱ्यांना राजकीय फायदा होऊ शकतो. भारताने हल्ला केला, तर पाकिस्तान शांत बसेल अशा भ्रमात राहू नका, हल्ला झाला तर पाकिस्तानही त्याला प्रत्युत्तर देईल. तसेच एकदा युद्ध सुरू झाले की ते थांबवणे कुणाच्याही हातात नसेल.”