‘या’ माजी केंद्रीय मंत्र्यांचा CM ठाकरेंवर ‘निशाणा’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पालघरमधील मॉब लिंचिंगच्या घटनेवरून साधू-संतामध्ये नाराजी आहे. दर दुसरीकडे याच प्रकरणावरून राज्यातील प्रकरण तापले आहे. राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यावर निशाणा साधला आहे. या प्रकरणात गृहमंत्र्यानी राजीनामा देण्याची देखील मागणी विरोधकांनी केली आहे. या प्रकरणात मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री उमा भारती यांनीही उडी घेतली आहे. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

पालघर जिल्ह्यातील गडिचंचले गावात दोन साधू व त्यांच्या एका वाहन चालकाची निर्घृण हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे पोलिसांसमोर हा प्रकार घडला. या प्रकरणी उमा भारती यांनी ट्विट केले असून, संतांच्या हत्येत होरपळून महाराष्ट्रातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारची राखरांगोळी होईल, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. पालघरमध्ये संताची जी निघृण हत्या झाली त्यामध्ये 70 वर्षीय एका वृद्ध संतही होते. ही घटना अंतर्मन हेलावणारी आणि अतिशय वेदनादायी आहे. व्हिडिओत आरोपी स्पष्ट दिसत आहेत. पोलिसांसमोर हे महापाप झालंय या राज्यात उद्धव ठाकरेंचे सरकार आहे, असं उमा भारती यांनी म्हटल आहे.

या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा होण्यासाठी जलद गती न्यायालयाच्या माध्यमातून कायदेशीर प्रक्रिया राबवली गेली पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारची या महान संताच्या हत्येत होरपळून राखरांगोळी होईल असं वाटतंय. साधूंच्या जूना आखाड्याशी आपले आत्मीय संबंध आहेत. या घटनेला मी कधीही विसरणार नाही. संपूर्ण देशाने या घटनेचा निषेध केला पाहिजे असेही उमा भारती यांनी म्हटले आहे.