पालघरमध्ये मायलेकीचा खून, आरोपीला मिर्झापूरमधून अटक

पालघऱ : पोलीसनामा ऑनलाइन – पालघर (Palghar) तालुक्यातील पास्थळ ग्रामपंचायत हद्दीमध्ये एका घरात दोन महिलांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले होते. हा प्रकार 11 डिसेंबर रोजी उघडकीस आला होता. या गुन्ह्यातील आरोपीला (Accused) उत्तर प्रदेशातील (UP) मिर्झापूर (Mirzapur) येथून अटक (Arrst) करण्यात आली आहे. ही कारवाई बोईसर स्थानिक गुन्हे शाखेने केली असून आरोपीला बोईसर येथे आणण्यात येत आहे.

पास्थळ ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या छाया निवास या घरामध्ये लक्ष्मी रवींद्र पवार (वय-50) आणि त्यांची मुलगी सोनाली रवींद्र पवार (वय-30) या दोघींचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. परिसरात दुर्गंधी येऊ लागल्याने स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली होती. पोलिसांनी 11 डिसेंबर रोजी घराचा दरवाजा उघडला असता घरात दोघींचे मृतदेह आढळून आले होते. आरोपी गुन्हा केल्यानंतर उत्तर प्रदेशात पळून गेला होता.

गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी इमारतीत असलेले सीसीटीव्ही तपासले. त्यावेळी हा गुन्हा 6 डिसेंबर रोजी घडला असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. तपासादरम्यान पोलिसांना काही कागदपत्रे मिळाल्यानंतर मयत महिलेचा पती खोटी कागदपत्रे बनवून याठिकाणी वावरत असल्याचे समोर आले. आपले आडनाव पवार सांगत असलेला हा व्यक्ती मुळचा यूपीचा असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांना समजली.

दरम्यान, आरोपीचा शोध सुरु असताना आरोपी मिर्झापूर येथे असल्याची माहिती मिळाली. पोलिसांच्या एका पथकाने मिर्झापूर येथून आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून त्याला बोईसरमध्ये आणले जात आहे. यानंतरच खुनाचे नेमके कारण स्पष्ट होईल असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.