बीडमध्ये पंकजा मुंडेंना करावा लागणार दुहेरी ‘सामना’

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसून यात आहे. शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी मात्र बीडमध्ये पंकजा मुंडेंना थेट विरोध केला आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांना आता त्यांच्या होम ग्राऊंडवर धनंजय मुंडे तसेच विनायक मेटे असा दुहेरी सामना करावा लागणार आहे. विनायक मेटे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आहेत.

भाजप सरकारचा घटक पक्ष असलेला विनायक मेटेंचा शिवसंग्राम पक्ष आणि पंकजा मुंडे यांच्यात कायमच दुरावा राहिलेला आहे. शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी मी राज्यात भाजपसोबत असेन पण, बीडमध्ये नाही असं विधान केलं आहे. बीडमध्ये एकीकडे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी हा संघर्ष अधिक तीव्र होताना पाहायला मिळतोय, तर दुसरीकडे विनायक मेटे यांनी पंकजा मुंडे यांना मदत न करण्याची भूमिका घेतली आहे. एकीकडे धनंजय मुंडेंचे आव्हान तर दुसरीकडे विनायक मेटे यांचा असहकार अशा दोन्ही बाजूंचा सामना मुंडे यांना करावा लागणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत विनायक मेटे यांचा शिवसंग्राम पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष होता. त्यावेळी त्यांनी बीडमधून विधानसभेची निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढवली होती.

पंकजा मुंडेंना सुप्रीम कोर्टाचा दणका
अंगणवाडी पोषण आहाराची ६, ३०० कोटींची कंत्राटं रद्द करण्याचे आदेश देत सुप्रीम कोर्टाने पंकजा मुंडेंना दणका दिला आहे. केंद्र सरकारचे नियम डावलून ही कंत्राटं बड्या ठेकादारांना दिली गेली आहेत. यामुळे ही कंत्राटं रद्द करून चार आठवड्यात नवे कंत्राट काढण्याचा आदेश, सुप्रीम कोर्टाने दिला आहे. तसेच काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी मोबाईल खरेदीत तब्बल १०६ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेत केला होता.