ऐन निवडणूकीत भाजपवर शोककळा; नगरसेविका मुग्धा लोंढे यांचा अपघातात जागीच मृत्यू

पनवेल : पोलीसनामा ऑनलाइन – पनवेल महापालिकेच्या भाजपच्या नगरसेविका मुग्धा लोंढे यांचा आज (गुरुवार) शहरामध्ये झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला. तर भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा कल्पना राऊत या जखमी झाल्या आहेत. रस्त्याच्या कडेला उभ्या असताना अर्धवट कँक्रिटीकरण कामामुळे एक स्विफ्ट डिझायर गाडी अडकल्यामुळे अडकलेली गाडी काढताना वेगाने  रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या या दोघींच्या अंगावर गाडी गेली.

प्रीचीन हॉस्पिटल येथून एच एस सी कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर झालेल्या अपघातात कल्पना राऊत या गंभीर जखमी झाल्या तर मुग्धा लोंढे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच भाजप कार्य़कर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी कल्पना राऊत यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच निवडणूक प्रचारात असलेले आमदार प्रशांत ठाकूर, माजी खासदार रामशे ठाकूर, जे.एम. म्हात्रे, महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्यासह नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या कल्पना राऊत यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

isit : Policenama.com