3 हजाराची लाच घेताना पोलीस पाटील अन् त्याची पत्नी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत अनुदान मंजूर करण्यासाठी 3 हजार रुपयांची लाच घेताना पोलीस पाटलासह त्यांच्या पत्नीला परभणी एसीबीने रंगेहात पकडले. ही कारवाई बुधवारी दुपारी करण्यात आली आहे.

लक्ष्मण उत्तमराव कोपरटकर (वय 40 मौजे पोहंडुळ, ता मानवत, जि. परभणी) व शारदा लक्ष्मण कोपरटकर (वय 30 वर्ष, रा.पोहंडुळ, ता. मानवत, जि. परभणी) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत 30 वर्षाच्या व्यक्तीने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

यातील तक्रारदार यांनी संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत अनुदान हवे होते. त्यासाठी त्यांनी संजय गांधी निराधार कार्यालयात अर्ज केला होता. दरम्यान, त्यांना अनुदान मंजूर करून देण्यासाठी लोकसेवक आरोपी लक्ष्मण कोपरटकर याने त्यांच्याकडे 3 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. याबाबत त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार, या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. बुधवारी सकाळी खासगी व्यक्ती तसेच लोकसेवक कोपरटकर यांची पत्नी यांना त्यांच्यातर्फे तक्रारदार यांच्याकडून 3 हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे.

नांदेड विभागाच्या पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक भरत हुंबे, पोलीस निरीक्षक भुजंग गोडबोले व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.