परभणी महानगरपालिकेतील राष्ट्रवादीच्या १३ नगरसेवकांचे राजीनामे

परभणी : पोलीसनामा ऑनलाईन  ऐन निवडणुका तोंडावर असताना परभणीत राष्ट्रवादीच्या १३ नगरसेवकांनी आपले राजीनामे पक्षाकडे पाठवल्याची माहिती मिळते आहे. ऐन निवडणुका तोंडावर असताना हा राष्ट्रवादीला मोठा धक्का ठरू शकतो. दरम्यान  ग्रामीण परभणीचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून या नगरसेवकांनी राजीनामे दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. परभणी महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे एकूण 18 नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी १३ नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत.

काय आहे राजीनाम्याचे कारण
परभणी महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्य विष्णू नवले यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीला हे पद देण्याचा ठराव राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी घेतला होता. मात्र बाबाजानी दुर्राणी यांनी ऐन वेळेला पक्षाशी संबंध नसलेल्या अतिक इनामदार यांचा अर्ज दाखल केल्याने राष्ट्रवादीचे नगरसेवक चांगलेच संतापले. त्यामुळे संतापलेल्या १३ नगरसेवकांनी शहर जिल्हाध्यक्ष स्वराज परिहार यांच्याकडे आपले राजीनामे दिले आहेत.

अतिक इनामदार यांचा अर्ज भरण्याचा निर्णय बाबाजानी यांनी मनमानी करुन घेतला आहे. तसेच बाबाजानी हे ग्रामीण जिल्हाध्यक्ष असताना परभणी शहरात मोठ्या प्रमाणावर दखल देत आहेत. पक्षाच्या नगरसेवकांनाच विचारात घेत नसल्याने आम्ही पक्षात का राहायचं ? असा सवालही या नगरसेवकांनी उपस्थित केला आहे. एवढेच नाही तर बाबाजानी यांनी दाखल केलेला इनामदार यांचा अर्ज रद्द करावा, अशी मागणीही नगरसेवकांनी आयुक्तांकडे केली आहे. या प्रकरणी पक्षाचे नेते अजित पवार यांच्याकडे दाद मागणार असल्याचंही नगरसेवकांनी सांगतिलं. तरी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच शहरात निर्माण झालेली ही मोठी बंडाळी राष्ट्रवादीसाठी धडकी भरवणारी आहे.

राजीनामा दिलेल्या नगरसेवकांची नावे खालीलप्रमाणे
१)बाळासाहेब बुलबुले
२)चांद सुभाना जाकेर खान
३)अमरिका बेगम अब्दुल समद
४)विकास लंगोटे
५)संगीता दुदगावकर
६)अली खान मोईन खान
७)वर्षा खिल्लारे
८)शेख फहेद शेख हमीद
९)आबेदा बी सय्यद अहेमद
१०)अमोल पत्रीकर
११)शेख आलीया अंजुम
१२)मो. गौस
१३)नजेमा बेगम शेख अब्दुल रहीम