नव्या ससंद भवनाचे छायाचित्र आले समोर, लोकसभेत असतील 800 पेक्षा जास्त सीट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   इंग्रजांच्या काळात उभारलेले भारताचे संसद भवन आता केवळ इतिहासात राहील. सध्याच्या संसद भवनाजवळ नवीन संसद भवन बांधण्याचे काम सुरू आहे. नवे संसद भवन कसे असेल, त्याचे छायाचित्र समोर आले आहे. 971 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येत असलेल्या नव्या संसद भवनचे भूमीपूजन 10 डिसेंबरला दुपारी 1 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येईल. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शनिवारी ही माहिती दिली.

ओम बिर्ला यांनी म्हटले की, नवीन संसद भवनचा भूमीपूजन सोहळा 10 डिसेंबरला दुपारी 1 वाजता आयोजित करण्यात येईल. सोहळ्याची सुरूवात पंतप्रधानांच्या हस्ते भूमीपूजनाने होईल. तत्पूर्वी, ओम बिर्ला यांनी पीएम मोदी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना भूमीपूजन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बनण्यासाठी निमंत्रण दिले.

ओम बिर्ला म्हणाले, नवीन संसद भवन आत्मनिर्भर भारताचे एक असे मंदिर असेल जे राष्ट्राची विविधता प्रतिबिंबित करेल. हे जुन्या संसद भवनापेक्षा 17,000 चौ. मी. मोठे असेल. त्यांनी सांगितले की, हे 971 कोटी रूपये खर्च करून 64,500 चौ. मी. क्षेत्रात उभारण्यात येईल. टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडला नवीन संसद भवन उभारण्याचा ठेका देण्यात आला आहे. लोकसभा अध्यक्षांनी सांगितले की, डिझाईन एचसीपी डिझाईन, प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडने तयार केले आहे.

त्यांनी म्हटले की, स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने आम्ही नवीन संसद भवनात दोन्ही सभागृहांच्या सत्राला सुरूवात करू. नवीन संसद भवनात लोकसभा सदस्यांसाठी सुमारे 888 सीट आणि राज्यसभा सदस्यांसाठी 326 पेक्षा जास्त सीट असतील. ओम बिर्ला म्हणाले, लोकसभा हॉल 1224 सदस्यांना एकाचवेळी समावून घेण्यास सक्षम असेल.

संविधान कक्षात दिसणार लोकशाहीचा वारसा

लोकसभा आणि राज्यसभेच्या कक्षांशिवाय नव्या भवनात एक भव्य संविधान कक्ष असेल. ज्यामध्ये भारताचा लोकशाही वारसा दर्शवण्यासाठी अन्य वस्तुंसह संविधानाची मूळप्रत, डिजिटल डिस्प्ले इत्यादी असेल. विधान कक्षात पाहुण्यांना जाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, जेणेकरून संसदीय लोकशाहीच्या रूपात भारताच्या प्रवासाबाबत जाणून घेता येईल.