धनंजय मुंडेंवरील आरोप गंभीर, लवकरच निर्णय घेऊ, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांचे संकेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   एका महिलेने केलेल्या बलात्काराच्या आरोपामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर मोठ राजकीय संकट ओढवलं आहे. महिलेने केलेल्या आरोपामुळे मुंडे यांच्यावर विरोधकांकडून टीका होत असून राजीनाम्याची मागणी होत आहे. दरम्यान या घटनेनंतर आता मुंडे यांच्याबद्दलची पक्षाची भूमिका पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केली आहे. मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर स्वरुपाचे आहेत. त्यांनी माझ्याकडे सविस्तर माहिती दिली आहे. या संदर्भात पक्षातील वरिष्ठ सहकाऱ्यांशी बोलण झाले नाही. त्यांच्याशी संवाद साधून, विचारविनिमय झाल्यानंतरच निर्णय घेतला जाईल. मुंडे यांच्यावरील आरोपांचा पोलिसांकडून तपास होईलच. मात्र त्याआधी पक्ष म्हणून आम्हाला निर्णय घ्यावा लागेल, असे पवार म्हणाले.

धनंजय मुंडेंनी माझी भेट घेऊन त्यांनी त्यांची बाजू सविस्तर मांडली. त्यांचा काही व्यक्तींशी घनिष्ठ संबंध आला. आता त्याबद्दल पोलीस ठाण्यात काही तक्रारी दाखल झाल्या आहेत. चौकशीची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणावरून व्यक्तिगत स्वरुपाचे हल्ले होणार याची बहुधा त्यांना पूर्वकल्पना असावी. त्यामुळे ते आधीच कोर्टात गेले. त्यामुळे कोर्टाच्या विषयावर मी बोलणार नाही, असे पवार यांनी सांगितले.

मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांबद्दल, विरोधकांकडून होत असलेल्या राजीनाम्याच्या मागणीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी काही बोलण झाले का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर आधी पक्षातल्या वरिष्ठ सहकाऱ्यांशी बोलू. मग मुख्यमंत्र्यांशी संवाद साधू, असे उत्तर पवार यांनी दिले. याप्रकरणी निर्णय घेताना आम्ही मुख्यमंत्र्यांची वाट पाहणार नाही. पक्ष योग्य तो निर्णय घेईल. मात्र तो घेत असताना कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेऊ. यासोबतच आरोपांचे गांभीर्य या गोष्टीही लक्षात घेऊ असे पवार यांनी सांगितले.