‘या’ मुख्यमंत्र्याने अडवली ‘मोदी लाट’ ; पाचव्यांदा घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ

भुवनेश्वर : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत भाजपने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड यश मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मोदी लाटेचा’ करिष्मा पुन्हा एकदा पाहायला मिळाला. अनेक प्रादेशिक पक्षांना या मोदी लाटेचा फटका बसला. ममता बॅनर्जी यांचा गड मानल्या जाणाऱ्या पश्चिम बंगालमध्ये देखील भाजपने घवघवीत यश मिळवत ममता यांच्या गडाला खिंडार पाडले. सर्वत्र मोदी लाट धुमाकूळ घालत असताना एका राज्यावर या मोदी लाटेचा परिणाम झाला नाही ते राज्य म्हणजे ओडिशा.

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी भाजपच्या विजयी रथाला ओडिशामध्ये थांबवले आणि सलग पाचव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. लोकसभा निवडणूक होत असताना चार राज्यांच्या विधानसभा निवडणूका देखील चालू होत्या. ओडिशामध्ये लोकसभा निवडणुकी बरोबरच विधानसभा निवडणूक देखील झाली.

विधानसभेबरोबर लोकसभेतही मिळवले यश

मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या नेतृत्वाखाली बीजू जनता दलाने गेल्यावेळेस पेक्षा २ % जास्त मते मिळवत विजय संपादन केला. ओडिशा विधानसभेच्या १४६ जागांपैकी ११२ जागा बिजू जनता दलाला मिळाल्या आहेत तर भाजप २३ जागा जिंकून दुसऱ्या स्थानावर आहे पण यांमुळे पटनाईक यांच्या व्होट बँकेवर कोणताही परिणाम झाला नाही. पटनाईक यांच्या बिजू जनता दलाने विधानसभेबरोबरच लोकसभेत देखील यश मिळवले आहे. लोकसभेच्या २१ जागांपैकी बिजू जनता दलाने १२ जागा मिळवल्या आहेत तर भाजपने ८ जागा मिळवल्या आहेत. काँग्रेसला फक्त एकच जागा मिळाली आहे.नवीन पटनाईक यांनी पूर्ण प्रचारामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वैयक्तिक टीका केली नाही तसेच नम्र भाषा वापरली.

पटनाईक ओडिशासाठी समर्पित, २२ वर्षात एकदाही सुट्टी घेतली नाही

गेल्या दोन दशकापासून नवीन पटनाईक यांना ओळखणारे ओडिशाचे लोक पटनाईक यांच्या ओडिशाप्रती असणाऱ्या समर्पित वृत्तीला चांगले जाणून आहेत. पुरी लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले बिजू जनता दलाचे खासदार पिनाकी मिश्र म्हणतात की,पटनाईक यांनी राजकारणात आल्यानंतर गेल्या २२ वर्षात एकदाही सुट्टी घेतली नाही. ओडिशाच्या लोकांच्या प्रति त्यांच्या असणाऱ्या निष्ठेला तोड नाही.