खळबळजनक ! आजारी पोलिसाने टपरीतून पाणी घेतल्याने जमावाकडून चप्पलने बेदम मारहाण

लखनऊ : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशच्या मिर्जापूर जिल्ह्यात जमावाने एका पोलिस कर्मचाऱ्याला चप्पलने मारहाण केली आणि त्याला धक्काबुक्कीही केल्याची घटना समोर आली आहे. पोलिस कर्मचाऱ्याने एका टपरीतून पाणी घेतल्याने त्याला अशी मारहाण करण्यात आली.

ही घटना कात्ररा कोतवाली पोलिस ठाण्याजवळ घडली आहे. संगम परिसरात शुक्रवारी संध्याकाळी साध्या कपड्यांमध्ये कात्ररा पोलिस ठाण्यात तैनात असलेल्या एक आजारी पोलिसाने रस्त्याच्या कडेला असलेल्या एका हातगाड्यातून सफरचंद विकत घेतले आणि जवळच्या टपरीतून पाणी घेऊन सफरचंद धुतले. सुरुवातीला टपरीवाला व पोलीस यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. यानंतर आसपासच्या लोकांनी घेराव घातला आणि तेथे उपस्थित असलेल्या महिला व मुलांनी चप्पलने पोलिसाला मारहाण केली.

जेव्हा दुसरा पोलिस त्याला वाचवण्यासाठी आला तेव्हा तेथे उपस्थित लोकांनी त्यालाही मारहाण केली. पोलिसाला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर अप्पर पोलिस अधीक्षक प्रकाश स्वरूप यांनी सांगितले की, हा पोलीस आजारी आहे आणि तो सफरचंद खरेदी करून पाण्याने धुवत होता. त्याने जवळच्या टपरीतून पाणी घेतले. ते म्हणाले की, आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, लवकरच कारवाई केली जाईल.

आरोग्यविषयक वृत्त