‘साम, दाम, दंड, भेद सगळं करुनही पंढरपूरात महाविकास आघाडीला अपयश’; जनतेनं नाकारलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. राष्ट्रवादीने दिवंगत आमदार भारत भालके यांचे सुपुत्र भगिरथ भालके यांना उमेदवारी दिली. तर भाजपने समाधान अवताडे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. आज झालेल्या मतमोजणीत अवताडे यांनी विजयी आघाडी घेतल्याचे पहायला मिळत आहे. अवताडे यांचा विजय जवळपास निश्चित समजला जात असून, भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

महाविकास आघाडीची ताकद उपमुख्यमंत्री अजित पवार ठाणं मांडून बसलेले, टप्प्यात आलं की गेम करण्याची भाषा करणारे जयंत पाटील यांचे दौरे, नाना पटोले यांची सभा प्रशासनाचा साम, दाम, दंड, भेद, सगळं करुनही जनतेने नाकारले. पंढरपूरात भाजपाचा आमदार हा राज्य सरकारविरोधातील जनतेचा कौलच, असं केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे.

पाण्याचा मुद्दा ठरला महत्त्वाचा
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातल्या 35 गावांच्या पाण्याचा प्रश्न हा मुद्दा यंदाच्या निवडणुकीत चर्चेचा आणि राजकीय सभांचा खास विषय ठरला. तसेच राज्यातील कोरोना संकटाची हाताळणी हा मुद्दा भाजपने उचलून धरला होता. रेमडेसिविर, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, लसींचा तुटवडा आणि पुरवठा या मुद्यांवरुन दोन्ही पक्षांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या.