‘DSK यांची मालमत्ता ताब्यात घ्या अन् विल्हेवाट लावून गुंतवणूकदारांना पैसे द्या’, हाय कोर्टात याचिका

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – डीएसके प्रकरण तातडीनं निकाली काढावं जेणेकरून गुंतवणूकदारांना न्याय मिळेल. डीएसकेंची मालमत्ता ताब्यात घेऊन त्याची विल्हेवाट लावून गुंतवणूकदारांना पैसे द्यावे अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. अ‍ॅड चंद्रकांत बीडकर यांनी डीएसके प्रकरणातील 51 याचिकाकर्ते आणि 32 हजार गुंतवणूकदारांतर्फे मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

15 फेब्रवारी 2020 रोजी पुण्यातील न्यायालयात हा खटला लवकर निकाली काढावा यासाठी अ‍ॅड बीडकर यांनी याचिका दाखल केली होती. याववर निर्णय देण्यात आलेला नाही. त्यामुळं आता बीडकर यांनी गुंतवणूकदारांच्या वतीनं उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

काय म्हटलंय याचिकेत ?

या प्रकरणात गुंतवणूकदारांचे 1153 कोटी रुपये तात्काळ देण्यात यावे तसेच हे प्रकरण तातडीनं निकाली काढावं, डीएसके यांचा ड्रीम सिटी प्रोजेक्ट म्हाडाला देऊन येणाऱ्या रकमेतून ठेवीदारांचे पैसे परत करण्याबद्दल मागणी करण्यात आली आहे. सरकारनं जप्त केलेल्या डीएसके यांच्या मालमत्तेचा ताबा अद्याप मिळालेला नसल्यानं त्याचा लिलाव करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळं या मालमत्ता ताब्यात घेऊन त्याचा लिलाव करावा असंही या याचिकेत नमूद करण्यात आल्याचं बीडकर यांनी सांगितलं.

डीएसके यांनी चांगल्या परताव्याच्या आमिषानं गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केली आहे. डीएसके यांना या प्रकरणी कुटुंबियांसह अटक करण्यात आली आहे. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणाची सुनावणी गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. हे प्रकरण निकाली निघावे अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.