सलग चौथ्या दिवशी वाढले पेट्रोल-डिझेलचे दर

पोलिसनामा ऑनलाईन टीम – देशभरामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. तेल कंपन्यांनी सलग चौथ्या दिवशी इंधनाचे दर वाढवले आहेत. रविवारपासून सुरु असणार्‍या दरवाढीमध्ये आज पेट्रोलचे दर 40 पैसे प्रती लीटर तर डिझेलचे 45 पैसे प्रति लीटरने वाढवण्यात आले आहेत. मंगळवारी तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात 58 पैशांची तर डिझेलच्या दरात 54 पैशांची वाढ केली होती.

रविवारी पहिल्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 60 पैसे प्रति लीटरची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर सोमवारीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 60 पैशांची वाढ झाला होती. दिल्लीतील आजचा पेट्रोलचा दर वाढून 73.40 रुपये प्रति लीटर आणि डिझेलचा दर 71. रु62पये प्रति लीटर इतका झाला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्या असणार्‍या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमीटेडबरोबर हिंदुस्ताना पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडनेही 14 मार्चपासून इंधनाच्या दरांमध्ये रोज बदल करण्याचा निर्णय तात्पुरता मागे घेतला होता. मात्र लॉकडाउनचे नियम शिथिल केल्यानंतर दररोज इंधनदरवाढ होत असतानाच चित्र मागील चार दिवसांपासून पहायला मिळत आहे.

सरकारने मार्चमध्ये प्रती लीटरमागे 3 रुपयांनी अबकारी कर वाढवल्याने तेल कंपन्यांनी दरवाढ थांबवली होती. मात्र सरकारने करवाढ केल्यानंतरही कंपन्यांनी त्याचा भार ग्राहकांच्या खिशावर पडू न देण्याचा निर्णय घेत किंमती वाढवल्या नव्हत्या. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किंमती दोन दशकांमध्ये सर्वात कमी असतानाच सरकारने 6 मे रोजी तेल कंपन्यांकडून पेट्रोलवर प्रति लीटर 10 रुपये तर डिझेलवर प्रति लीटर 13 रुपये कर आकारण्यास सुरुवात केल्याचे पीटीआयने दिलेल्या वृत्तामध्ये म्हटले आहे.