Pune : …पोलिसांनी फोन केल्याने कर्जदारास परत मिळाली 60 लाखांची जमीन

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – बारामतीमध्ये प्रशासनाच्या कामाचा चांगला किस्सा ऐकायला मिळाला. प्रशासनानं मनावर घेतलं तर काय करू शकते ते बारामतीत पहायला मिळालं. पोलिसांनी एक फोन केला अन् सुमारे 60 लाखांची जमीन एकाला परत मिळाली.

बारामती तालुक्यामधील एका सावकाराचा हा किस्सा आहे. सावकारीच्या एका प्रकरणामध्ये 5 लाखांच्या बदल्यात 19 लाख रुपये दिल्यानंतरही आणखी 5 लाखांची सावकाराची मागणी सुरुच होती. कर्जदाराची जमीनही खरेदीखत करुन नावावर करुन घेऊन दमदाटी करणं सुरुच ठेवलं होतं.

बारामती शहर पोलिसांनी सावकारीच्या विरोधात सुरु केलेल्या मोहिमेची माहिती कर्जदाराला मिळाली होती. म्हणून त्यांनी थेट पोलिस ठाणे गाठले अन् पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे यांची भेट घेतली.

पोलिसांना या प्रकरणाचे गांभीर्य समजल्यावर पोलिस ठाण्यातून संबंधित सावकाराला चौकशी करायची आहे, तुम्ही पोलिस ठाण्यात या….,इतकाच निरोप गेला.

पोलिसांनी सावकारांच्या विरोधात उचलेल्या पावलांची माहिती असलेल्या संबंधित सावकाराने थेट कर्जदाराशी संपर्क करत कोणतीही रक्कम देऊ नका, तुमची जमीन स्वखर्चाने पुन्हा तुमच्या नावावर करुन देतो. पण, माझ्याविरुध्द तक्रार काही करु नका, अशी गळ घातलीय.

जी गोष्ट गेले अनेक महिने कर्जदाराकडून होऊ शकत नव्हती ती पोलिसांच्या एका फोनने काही तासातच पूर्ण झालीय. कर्जदाराला त्याची हक्काची जमीन तर मिळाली पण, हिशेबात नसलेल्या रकमेचा तगादाही संपला.

संबंधित सावकाराने सुमारे 60 लाख रुपये किंमतीची ही जमीन कायम परत करुन तो व्यवहार रद्द केला. पोलिसांच्या प्रभावी कामगिरीमुळे आज सावकारांचा जाच कमी होऊ लागला आहे, हे आता बारामती परिसरात दिसू लागले आहे.

सन 2014 मध्ये घेतलेल्या 5 लाखांच्या बदल्यात 4 वर्षात तब्बल 19 लाखांची वसूली केल्यावरही सावकाराने जमीनही स्वताःच्या नावावर करुन घेत कर्जदाराची पिळवणूक केली होती. मात्र, पोलिसांच्या खाकी दणक्याने त्याने वेळेवर पावले उचलत पोलिस कारवाईतून मान सोडवून घेतली.

कर्जदारांनी पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन
ज्या कर्जदारांना सावकारांकडून मानसिक आणि शारिरीक त्रास दिला जात असेल, अशा अवैध सावकारांविरुध्द लोकांनी निर्भयपणे पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे यांनी केलंय.