पिंपरी चिंचवड शहरात एकाच दिवशी 46 ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

पिंपरी :  पोलीसनामा ऑनलाइन –   पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून आज शनिवारी दिवसभरात ४६ रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये चिंचवडमधील आनंदनगर झोपडपट्टीसह पिंपरी, वाकड, भोसरी, वडमुखवाडी या भागातील रुग्णांचा समावेश आहे. शहरातील आजपर्यंतची रुग्णांची संख्या ३११ वर गेली असून त्यातील १६९ रुग्ण बरे झाले आहेत. तर १३५ सक्रिय रुग्णांवर महापालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पिंपरी-चिंचवड शहराला रेडझोनमधून वगळ्यात आले आहे. कालपासून शहरातील निर्बंध शिथील केले आहे. परंतु, कालपासून रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे.

काल एकाचदिवशी २१ जणांचे तर आज आत्तापर्यंत पिंपरी चिंचवड हद्दीतील ४६ तर बाहेरील ४ जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. आजपर्यंतची सर्वांत ही मोठी रुग्ण संख्या आहे. चिंचवड येथील आनंदनगर झोपडपट्टी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरली आहे.

आज पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांमध्ये आनंदनगर झोपडपट्टी, पिंपरी, वाकड, भोसरी, वडमुखवाडीतील येथील रुग्णांचा समावेश आहे. तसेच पुण्यातील चार जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत.