Pune : तरुणीची आत्महत्या ! प्रियकराला पाठवलेल्या शेवटच्या SMS मध्ये म्हणाली…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – तरुणानं प्रेमात धोका दिल्यानं चाकण परिसरात एका तरुणीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आत्महत्येपूर्वी तिनं प्रियकराला एक मेसेज केला आहे. माझ्या सोबत प्रेमाचं नाटक केलंस. मी आत्महत्या करत आहे असं यात म्हटलं आहे. आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण येथील 28 वर्षीय मुलीनं गेल्या महिन्यात प्रियकराचं नाव लिहून आत्महत्या केली होती. तब्बल महिन्याभरानंतर मुलीच्या आईनं दिलेल्या तक्रारीनंतर आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण परिसरात 22 सप्टेंबर रोजी एका तरुणीनं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. दरम्यान ही आत्महत्या प्रेमात प्रियकरानं धोका दिल्यानं केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलगी एका खासगी कंपनीत काम करत होती. तसंच तिचं लग्न झालेलं असून तिनं 5 वर्षे संसार करून पतीसोबत पटत नसल्यानं घटस्फोट घेतला होता. त्यानंतर ती आई वडिलांसोबत स्वतंत्र रहात होती. खासगी कंपनीत काम करून ती स्वत:चा उदरनिर्वाह भागवत होती.

या तरूणीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. त्यांना लग्न करायचं होतं. मुलानं नकार दिला असं मुलीच्या आईनं फिर्यादीत म्हटलं आहे. गेल्या महिन्यात मुलीनं आपल्या प्रियकराच्या मोबाईलवर मी आत्महत्या करत आहे. माझ्यासोबत प्रेमाचं नाटक केलंस, Your Time is over now… I am doingsuicide bye bye…! असा मेसेज पाठवला आणि नको तो निर्णय घेतला. या प्रकरणाचा अधित तपास चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश धस करत आहेत.