Pimpri News :  ‘Bumble’, ‘Tinder’ सारख्या डेटिंग App वरुन युवकांना ‘मादक’ अदांनी भुरळ घालणारी ‘सायली’ पोलिसांच्या ताब्यात, पुण्याच्या पोलीस आयुक्तालयाजवळ होती राहण्यास 

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बंबल, टिंडर अशा डेटिंग अ‍ॅपवरुन युवकांना भेटायला बोलावून गुंगीचे औषध देऊन लुबाडणाऱ्या तरुणीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तिच्याकडे केलेल्या चौकशीत तिने 16 युवकांना फसवल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी तिच्याकडून सोन्याचे 289 ग्रॅम वजनाचे दागिने, मोबाईल असा एकूण 15 लाख 25 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने केली.

सायली देवेंद्र काळे (वय-27 रा. साधू वासवानी रोड, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने बंबल अ‍ॅपवरुन ओळख करुन रावेत येथील तरुणाला 10 डिसेंबर 2020 रोजी भेटायला बोलावले. त्यावेळी तरुणाला गुंगीचे औषध देऊन त्याच्याकडील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 1 लाख 85 हजाराचा मुद्देमाल चोरून पसार झाली. तसेच चेन्नईवरुन वाकड येथे आलेल्या तरुणासोबत 17 जानेवारी 2021 रोजी असाच प्रकार घडला. त्याच्याकडील 1 लाख 50 हजारांचा मुद्देमाल चोरुन नेला.

तिच्याच पॅटर्ननुसार पोलिसांच्या जळ्यात अडकली

या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी बंबल अ‍ॅपवर स्वत:चे खोटे प्रोफाईल तयार करुन आरोपी तरुणीचे विविध प्रोफाईल शोधून काढले. तिला तिच्याच जाळ्यात अडकवण्यासाठी फ्रेंड रिक्वेस्ट पाठविल्या. त्यातील एक फ्रेंड रिक्वेस्ट तरुणीने स्वीकारली. त्यानंतर चॅटिंग करुन भेटीची वेळ ठरवण्यात आली. तिला 26 जानेवारीला भूमकर चौकात भेटण्यास बोलवले. तरुणी आली असता तिला ताब्यात घेण्यात आले.

पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरात 16 जणांची फसवणूक

आरोपी तरुणी डेटिंग अ‍ॅपवरुन पुण्यातील नसलेल्या तरुणांना हेरुन त्यांच्याशी ओळख करुन त्यांना भेटायला बोलावत होती. लॉजवर किंवा संबंधित तरुणाच्या घरी ती भेटायला जात होती. त्यानंतर तरुणाच्या पेयात झोपेच्या गोळ्या टाकून त्याला बेशुद्ध करत होती. त्यानंतर दागिने, रोख रक्कम घेऊन ती पसार होत होती.

मोबाइलमधील चाटिंग डिलीट करत होती

तरुण बेशुद्ध झाल्यानंतर त्याचा मोबाइल फोन घेऊन त्यातील त्यांच्यातील चॅटिंग डिलिट करुन संबंधित डेटिंग अ‍ॅप डिअ‍ॅक्टिव्ह करुन फोन फोडून कचऱ्यात टाकून देत होती. आरोपी तरुणीने पुणे व पिंपरी चिंचवड शहर परिसरात 16 जणांना फसवल्याचे तपासात निष्पन्न झाले.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त आर आर पाटील, प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट चारचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धर्मराज आवटे, दादाभाऊ पवार, पोलीस कर्मचारी प्रवीण दळे, नारायण जाधव, संजय गवारे, अदिनाथ मिसाळ, रोहिदास आडे, तुषार शेटे, लक्ष्मण आढारी, मोहम्मद गौस नदाफ, वासुदेव मुंडे, शावरसिद्ध पांढरे, प्रशांत सैद, सुनील गुट्टे, तुषार काळे, सुरेश जयभाये, अजिनाथ ओंबासे, धनाजी शिंदे, सुखदेव गावंडे, गोविंद चव्हाण, स्वाती रुपनवर, वैशाली चांदगुडे, सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय तुंगार, राजेंद्र शेटे, नागेश माळी, पोपट हुलगे यांच्या पथकाने केली.