Coronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 1956 नवीन रुग्ण, 3315 जणांना डिस्चार्ज

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. दररोज नवीन रुग्णांच्या संख्येत मोठी भर पडत आहे. कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम रबावण्यात येत आहे. तसेच कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र, रुग्ण संख्येचा वाढता आलेख खाली येण्याचे नाव घेत नाही. पिंपरी चिंचवड शहरात मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंता वाढली आहे. गेल्या 24 तासात शहरात नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या दुप्पट आहे. त्यामुळे दिलासा मिळाला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात शहरात 1956 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 05 हजार 901 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 3315 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 1 लाख 80 हजार 839 रुग्ण बरे झाले आहेत. शहरामध्ये सध्या 22 हजार 231 अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शहरामध्ये रुग्णसंख्या वाढत असताना मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आज दिवसभरात 98 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये 55 रुग्ण शहरातील आहेत. तर 43 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत. आजपर्यंत शहरामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 4168 इतकी झाली आहे. यामध्ये शहरातील 2831 तर हद्दीबाहेरील 1337 रुग्णांचा समावेश आहे. पिंपरी चिंचवड आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आधी मृत झालेल्या केसेस आज कळवण्यात आल्याने मृत्यूची संख्या अधिक दिसून येत आहे. मागील 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये 19 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आज मृत्यू झालेले रुग्ण पिंपळे गुरव, दिघी, रुपीनगर, थेरगाव, चिखली, चिंचवड, पिंपरी, काळेवाडी, निगडी, दापोडी, पुनावळे, भोसरी, पिंपळे निलख, रहाटणी, आकुर्डी, तळवडे, पिंपळे सौदागर, सांगवी, थेरगाव, कात्रज, शिरोली, चाकण, विश्रांतवाडी, सिन्नर, अहमदनगर, कोथरुड, वाघोली, पुणे, मारुडी, मंचर, वारजे, वडगाव, वानवडी, खेड, नारायणगाव, निमगाव, लोणावळा, जुन्नर, धायरी, लोणावळा, येरवडा, धनकवडी, कोथरुड, मुंबई, दौंड, पुणे येथील रहिवाशी आहेत.