Coronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 2516 नवीन रुग्ण, 93 जणांचा मृत्यू

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. राज्यात दररोज नवीन रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यातील प्रमुख शहरांत जास्त प्रमाणात झाला आहे. रुग्ण वाढत असल्याने याचा परिणाम आरोग्य यंत्रणेवर पडला आहे. पुण्यामध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून येत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. पिंपरी चिंचवड शहरात देखील कोरोना रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून वाढ होत आहे. शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना मृतांच्या संख्येत देखील वाढ होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्या 24 तासात 2516 नवीन रुग्णांची भर पडली आहे. तर 93 जणांचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज (गुरुवार) दिवसभरात शहरात 2516 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 08 हजार 417 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 2247 रुग्णांची कोरोनाची दुसरी टेस्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्य़ंत 1 लाख 83 हजार 086 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 22 हजार 451 अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शहरामध्ये रुग्णसंख्या वाढत असताना मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आज दिवसभरात 93 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये 49 रुग्ण शहरातील आहेत. तर 44 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत. आजपर्यंत शहरामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 4261 इतकी झाली आहे. यामध्ये शहरातील 2880 तर हद्दीबाहेरील 1381 रुग्णांचा समावेश आहे.

आज मृत्यू झालेले रुग्ण पिंपरी, दिघी, दापोडी, पिंपळे निलख, रहाटणी, पुनावळे, काळेवाडी, चिंचवड, भोसरी, वाकड, यमुनानगर, थेरगाव, पिंपळे गुरव, भोसरी, सांगवी, अजंठानगर, कासारवाडी,चऱ्होली, पिंपळे सौदागर, निगडी, हिमाचल प्रदेश, हडपसर, औंध, सिंहगड रोड, धाणोरी, कामशेत, चाकण, खडकी, खेड, खराडी, आळंदी, आंबेठाण, पिंपळगाव, येरवडा, पुणे, येथील रहिवाशी आहेत.