Coronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा धोका कायम ! दिवसभरात 2100 पेक्षा जास्त नवे पॉझिटिव्ह तर 17 जणांचा मृत्यू

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर राज्यातील परिस्थिती सुधारत असताना कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वेगाने लोक संक्रमीत होऊ लागले आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. औद्योगिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णसंख्येत वाढ होत आहे. दोन दिवसांपासून शहरामध्ये दोन हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत. रुग्ण वाढत असताना मृत्यूचे प्रमाण वाढल्याने चिंता वाढली आह. गेल्या 24 तासात शहरामध्ये 2113 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 17 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात शहरात 2113 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 42 हजार 251 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 1161 रुग्णांची कोरोनाची दुसरी टेस्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्य़ंत 1 लाख 21 हजार 483 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 3360 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शहरामध्ये रुग्णसंख्या वाढत असताना मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आज दिवसभरात 17 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये 15 रुग्ण शहरातील आहेत. तर 2 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत. आजपर्यंत शहरामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 2857 इतकी झाली आहे. यामध्ये शहरातील 2018 तर हद्दीबाहेरील 839 रुग्णांचा समावेश आहे. आज मृत्यू झालेले रुग्ण पिंपरी, वाल्हेकरवाडी, चिंचवड, तळवडे, निगडी, दिघी, कासारवाडी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, चिखली, काळेवाडी, चाकण येथील रहिवाशी आहेत.