Coronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 2009 नवीन रुग्ण, 23 जणांचा मृत्यू

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. देशात महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्ण देखील महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असून वाढत्या रुग्णसंखेच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध लागू केले आहेत. तर आज (शुक्रवार) पासून विकेंड लॉकडाऊन सुरु करण्यात आला. कठोर निर्बंध लागू करुन ही रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. पुणे जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या आणि अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्या 24 तासात 2009 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 23 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर शहरात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या साडे चार हजाराच्यावर गेली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात शहरात 2009 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 63 हजार 128 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 1824 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 1 लाख 35 हजार 663 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 4677 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शहरामध्ये रुग्णसंख्या वाढत असताना मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आज दिवसभरात 23 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये 17 रुग्ण शहरातील आहेत. तर 6 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत. आजपर्यंत शहरामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 3004 इतकी झाली आहे. यामध्ये शहरातील 2139 तर हद्दीबाहेरील 865 रुग्णांचा समावेश आहे. आज मृत्यू झालेले चिखली, पिंपळे निलख, रहाटणी, आकुर्डी, भोसरी, काळेवाडी, वल्लभनगर, वाकड, चिखली, निगडी, थेरगाव, पिंपरी, मोशी, चिंचवड, केंदूर, कोंढवा, लोहगांव, पुणे, बोपोडी, आळंदी येथील रहिवाशी आहेत.