Coronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये ‘अ‍ॅक्टीव्ह’ रुग्णांची संख्या वाढली, दिवसभरात 952 रुग्ण ‘कोरोना’मुक्त

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. शहरामध्ये मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. रुग्ण वाढत असताना मृत्यूचे प्रमाण देखील वाढत असल्याने चिंता वाढली आहे. आज दिवसभरात पिंपरी चिंचवड शहरात 1092 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर 17 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे 601 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात रुग्णांची संख्या वाढत असताना सक्रीय रुग्णांची देखील संख्या वाढत आहे.

पिंपरी चिंचवड मनपा आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी 4 वाजेपर्यंत शहरामध्ये 1092 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 29 हजार 157 एवढी झाली आहे. आज आढळून आलेले 1092 रुग्ण हे शहरातील आहेत. आज शहराबाहेरील एकही रुग्ण आढळून आला नाही. तर शहराबाहेरील 386 रुग्णांवर शहरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच शहरातील 56 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याच दरम्यान 17 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 10 आणि शहराबाहेरील 7 रुग्णांचा समावेश आहे. शहरातील मृतांचा आकडा 601 वर पोहचला आहे. यामध्ये 485 रुग्ण शहरातील तर 116 रुग्ण शहराबाहेरील आहेत.

शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. आज दिवसभरात 952 रुग्णांची कोरोनाची दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 20 हजार 264 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या शहरामध्ये 4871 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. आज शहरामध्ये चिंचवड, चिखली, किवळे, काळेवाडी, भोसरी, खराळवाडी, कात्रज, चाकण, बिबवेवाडी, दौंड, चाकण, जळगांव येथील रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच पुण्यामधील रुग्णालयामध्ये चिखली, चिंचवड, बोपखेल येथील रुग्णांचा उचारादरम्यान मृत्यू झाला.