Coronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 680 नवे पॉझिटिव्ह तर 12 जणांचा मृत्यू

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले असून लॉकडाऊन काळात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे. शहरामध्ये आज दिवसभरात 680 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 11 हजार 681 वर पोहचली आहे. आज एकाच दिवशी शहरातील 12 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवड मनपा आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात शहरामध्ये 680 रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये शहरातील 643 तर 37 रुग्ण हे शहराबाहेरील आहे. या रुग्णांसह 255 रुग्णांवर शहरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर शहरातील 35 कोरोनाग्रस्त रुग्णावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज एकाच दिवशी शहरातील 12 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाची संख्या 266 इतकी झाली आहे. यामध्ये शहरातील 209 आणि शहराबाहेरील 57 रुग्णांचा समावेश आहे.

शहराची रुग्ण संख्या वाढत असताना कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येने 7 हजाराचा टप्पा ओलांडला आहे. आज दिवसभरात 391 रुग्ण बरे झाले आहेत. शहरात आतापर्यंत 7090 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या शहरामध्ये 3262 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह असून त्यांच्यावर शहरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज शहरामध्ये मृत्यू झालेले रुग्ण हे यमुनानगर, भोसरी, पिंपळे गुरव, खराळवाडी, चिंचवड, पिंपरी, फुगेवाडी, दापोडी, निगडी, वल्लभनगर, रुपीनगर येथील रहिवासी आहेत.