Coronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात ‘कोरोना’चे 1013 नवीन रुग्ण तर 18 जणांचा मृत्यू

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. शहरामध्ये मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. रुग्ण वाढत असताना मृत्यूचे प्रमाण देखील वाढत असल्याने चिंता वाढली आहे. आज दिवसभरात पिंपरी चिंचवड शहरात 1013 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर 18 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे 584 जणांचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवड मनपा आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरामध्ये 1013 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 28 हजार 065 एवढी झाली आहे. आज आढळून आलेल्या 1013 रुग्णांपैकी 987 रुग्ण शहरातील आहेत. आज शहराबाहेरील 26 रुग्ण आढळून आले आहेत. तर शहराबाहेरील 399 रुग्णांवर शहरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच शहरातील 54 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याच दरम्यान 18 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये 18 रुग्ण शहरातील आहेत तर 3 रुग्ण शहराबाहेरील आहेत. शहरातील मृतांचा आकडा 584 वर पोहचला आहे. यामध्ये 475 रुग्ण शहरातील तर 109 रुग्ण शहराबाहेरील आहेत.

शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. आज दिवसभरात 518 रुग्णांची कोरोनाची दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 19 हजार 312 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या शहरामध्ये 4851 रुग्ण ॲक्टिव्ह असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. आज शहरामध्ये सयोगनगर, आकुर्डी, भोसरी, वाल्हेकरवाडी, काळेवाडी, चिखली, चिंचवड, पिंपरी, स्पाईनरोड, चाकण, डांगेचौक, थेरगाव, देहूरोड येथील रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.