पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांची बदली, राजेश पाटील नवे आयुक्त

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांची बदली झाली असून त्यांच्या जागी ओडिसा केडरचे राजेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्रावण हर्डीकर यांच्या बदलीची चर्चा मागील काही दिवसांपासून होती. मात्र कोरोना काळात चांगली कामगिरी केल्याने त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर मागील महिन्यात त्यांना बढती मिळाली होती. अखेर श्रावण हर्डीकर यांची आज (शुक्रवार) पुणे येथील नोंदणी महानिरीक्षकपदी बदली करण्यात आली.

पिंपरी चिंचवड आयुक्त पदासाठी अनेकांची नावे चर्चेत होती. मात्र आज राजेश पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. रजेश पाटील हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विश्वासातील असल्याचे बोलले जात आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेत फेब्रुवारी 2017 मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर महापालिकेचे आयुक्त असलेले श्रावण हर्डीकर यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आयुक्तपदी नियुक्ती केली होती.