पिंपरी : गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाकडून तीन लाखांचा ऐवज हस्तगत

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या दोन वर्षापासून शहरात चोऱ्या करणाऱ्या चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन एकाला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून तीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि चोरीचे अन्य साहित्य जप्त केले आहे.
कम्या उर्फ कमलेश राजकुमार दिलीप कसबे (रा. पत्राशेड, पिंपरी) असे अटक केलेल्या सराईत चोरट्याचे नाव आहे. तर चार अल्पवयीन चोरट्यांना ताब्यात घेतले असून त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट दोनकडून सोनसाखळी आणि जबरी चोरी करणाऱ्या चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी एक पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक परिसरात गस्त घालत असताना पोलीस हवालदार शिवानंद स्वामी यांना माहिती मिळाली की, निगडी पोलीस ठाण्यात सोनसाखळी चोरी गुन्हा दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी पिंपरीतील मोरवाडी येथे एका शाळेसमोर येणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून चार अल्पवयीन मुलांना शिताफीने ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या मुलांकडे चौकशी केली असता चोरट्यांनी मागील दोन वर्षांपासून पिंपरी-चिंचवड परिसरात सोनसाखळी, जबरी चोरी, मोबाईल, पार्किंग केलेल्या कारमधील टेप, एटीएम आणि कारमधील बॅटऱ्या चोरल्याचे सांगितले. त्यांनी चोरी केलेले दागिने घरफोडी करणारा सराईत आरोपी कमलेश याच्याकडे दिल्याचे सांगितले. त्यानुसार, कमलेश याला ताब्यात घेण्यात आले.

आतापर्यंत पोलिसांनी पाच जणांकडून 3 लाख 4 हजार 150 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. पिंपरी, चिंचवड, निगडी, दिघी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या कारटेप, बॅटरी, मोबाईल आणि सोनसाखळी चोरीचे एकूण 15 गुन्हे उघडकीस आले आहेत. चार अल्पवयीन मुलांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली असून कमलेश याच्याकडे कसून तपास केला जात आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, सह पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याळ, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त आर आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, उपनिरीशक्षक निलपत्रेवार, पोलीस कर्मचारी दिलीप चौधरी, संजय पंदरे, शिवानंद स्वामी, केराप्पा माने, वसंत खोमणे, उषा दळे, विपुल जाधव, नामदेव कापसे, आतिष कुडके, शिवाजी मुंडे, अजित सानप, नामदेव राऊत यांच्या पथकाने केली.

Visit : policenama.com

You might also like